सांगली : महापालिकेच्या सत्तेत एकत्र असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीतील दरी दिवसेंदिवस रूंदावत चालली आहे. बुधवारी काँग्रेसची स्वतंत्र पक्ष बैठक झाली. सत्ता नसताना दोन्ही पक्षांची एकत्रित बैठका होत होत्या. पण आता सत्ता येताच दोन्ही पक्षांनी सवता सुभा मांडला आहे. त्यात राष्ट्रवादीतील बाह्यशक्तीच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही पक्षांत असंतोष वाढू लागला आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र लढली. काँग्रेसला २० तर राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या तर भाजपने बहुमताने सत्ता काबीज केली. गेली अडीच वर्षे भाजपविरोधात काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित संघर्ष केला. महासभेच्या पूर्वी दोन्ही पक्षांची एकत्रित पक्ष बैठका होत असे. सभेतील विषयाला विरोध करण्याची रणनीतीही दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकत्रित आखत होते; पण गेल्या सहा महिन्यांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.
त्याचा प्रत्यय बुधवारी आला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्या उपस्थितीत स्वतंत्र पक्ष बैठक घेतली. अडीच-तीन वर्षांत पहिल्यांदाच हा प्रकार घडला. या बैठकीत काँग्रेसने राष्ट्रवादीच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठविण्याचा निर्धार केला. महासभेत चर्चा होते एक आणि ठराव होतात दुसरेच असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे मागील सभेचे इतिवृत्त पूर्ण वाचूनच सभा सुरू करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे, तसा आग्रह महासभेत ते धरणार आहेत.
महापौर निवडीवेळी स्थायी समितीतील एक जागा काँग्रेसला देण्याबाबत नेतेमंडळींत चर्चा झाली होती. त्यानुसार राष्ट्रवादीने रिक्त जागेवर काँग्रेस सदस्याला संधी द्यावी, असा आग्रह उपमहापौर उमेश पाटील यांनी धरला आहे. या विषयावरूनही काँग्रेस व राष्ट्रवादीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकतेच काळी खण व चिल्ड्रन पार्कच्या भूमिपूजन कार्यक्रमावर काँग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे आता महापालिकेत काँग्रेसने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली असून सत्तेत राहून राष्ट्रवादीशी दोन हात करण्याची तयारी चालविली आहे.
चौकट
मिरज हायस्कूल कमिटीवर वाद
मिरज हायस्कूलसाठी समिती नियुक्त करण्याचा विषय शुक्रवारच्या महासभेत घेण्यात आला आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे पदसिद्ध सदस्य असतील. एकूण चार नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. काँग्रेसने त्यातील दोन जागांची मागणी केली आहे. राष्ट्रवादीने हा प्रस्ताव मान्य केला तरच महासभेत समिती स्थापन करण्याचे समर्थन करण्याचा निर्णयही पक्ष बैठकीत घेण्यात आला आहे.