लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरजेतील इतिहास संशोधकांना गिरिलिंग पर्वतरांगांमध्ये जुन्या मानवनिर्मित लेण्यांचा शोध लागला आहे. अशा पुरातत्त्वीय खजिन्याचे जतन व संवर्धन शासनाने करावे, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संशोधकांच्या मते, या नव्या जागेत बौद्ध लेण्यांचाही समावेश आहे. ज्यामध्ये स्तूप, चैत्यगृह आणि विहार यांचा समावेश आहे. एका मोठ्या बौद्ध स्तुपाचे अवशेष नव्या ठिकाणी सापडले आणि जवळच पाण्याच्या टाक्या खोदण्यात आल्या. स्तूप आणि सामान्य वास्तुकलेच्या अवशेषांवर आधारित ही लेणी मूळ बौद्ध लेणी आहेत, असे संशोधकांचे मत आहे. कुकटोळी गावाच्या बाजूलाही एक बौद्ध गुहा आहे.
सांगलीत या ऐतिहासिक बौद्ध वास्तूंचा शोध लागला आहे. गिरिलिंग टेकडी सांगलीच्या मिरज आणि कवठे-महांकाळ तालुक्यांच्या सीमेवर वसलेली आहे. पुरातत्त्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने, राज्य सरकार व जिल्हाधिकाऱ्यांनी या प्राचीनकालीन बौद्ध लेण्या, स्तूप, गुहांची होणारी तोडफोड, पुरावे नष्ट करणे तसेच इतर बेकायदेशीर अतिक्रमण तत्काळ थांबवून याचे संवर्धन करावे, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ लक्ष घालून “बौद्ध लेणी संवर्धन कमिटी” बनवावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे अमोल वेटम यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.