शिराळा नगरपंचायत उभारले दोन मियावकी जंगल प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 10:44 AM2021-01-08T10:44:21+5:302021-01-08T10:50:15+5:30
Muncipal Corporation shirala Sangli- संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानामध्ये शिराळा नगरपंचायतीने दोन मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प समाविष्ट केले आहेत. प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून उभे राहिलेले हे दोन्ही प्रकल्प शिराळा शहरास वरदान ठरत आहेत.शिराळा नगरपंचायत ही मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प माझी वसुंधरा अभियान मध्ये समाविष्ट करणारी राज्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे.
विकास शहा
शिराळा- संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानामध्ये शिराळा नगरपंचायतीने दोन मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प समाविष्ट केले आहेत. प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून उभे राहिलेले हे दोन्ही प्रकल्प शिराळा शहरास वरदान ठरत आहेत.शिराळा नगरपंचायत ही मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प माझी वसुंधरा अभियान मध्ये समाविष्ट करणारी राज्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे.
जपानचे प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर अकिरा मियावकी यांनी निश्चित केलेल्या पद्धतीनुसार हे प्रकल्प उभा करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये ६५ पेक्षा जास्त स्थानिक देशी प्रजातींच्या झाडांचा समावेश केला आहे. तसेच यामध्ये देशी औषधी, मसाल्याचे, फळांचे, फुलांचे विविध जाती आहेत.
या प्रकल्पामध्ये एकूण १७०० पेक्षा जास्त झाडांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प उभारणे आणि संवर्धनाचे काम प्लॅनेट अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील , उपाध्यक्ष प्रणव महाजन यांचे मार्फत सातत्याने होत आहे.
पहिला प्रकल्प डॉ. नितीन जाधव आणि दुसरा डॉ. दीपक यादव यांचे खाजगी जागेत उभारण्यात आला आहे. मियावकी जंगल प्रकल्प मध्ये शंभर वर्षात तयार होणारे नैसर्गिक जंगल दहा वर्षात तयार होत असते. २०१९ साली सुरू केलेल्या पहिल्या प्रकल्पातील सर्व झाडांची उंची वीस ते पंचवीस फूट इतकी आहे. २०२० साली सुरु केलेल्या दुसऱ्या प्रकल्पातील झाडांची उंची सहा ते सात फूट आहे.
अत्यंत कमी कालावधीत झाडांची एकमेकांमध्ये स्पर्धा लावून हे जंगल शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले आहे. या जंगलामुळे शिराळा शहरातील वायू प्रदूषण घटण्यास मदत होत आहे, तसेच पक्ष्यांचा अधिवास तयार होणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणे, विहिरी, बोर यांना मुबलक पाणी उपलब्ध होणे, जमिनीची धूप थांबणे, सौंदर्यीकरण असे अनेक कायमस्वरूपी फायदे या मियावकी जंगल प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहेत.
यामुळे नगरपंचायतचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नगरपंचायत मार्फत मियावाकी जंगलच्या संगोपनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टीचा पुरवठा होत आहे. तसेच अशा प्रकारचे अनेक प्रकल्प राज्यात उभे रहावेत आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे असे मत नगराध्यक्षा सुनिता निकम,उपनगराध्यक्ष विजय दळवी मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी व्यक्त केले आहे