सांगली : कोरोनाचा बहर ओसरताच फिरू लागलेली ट्रॅव्हल्सची चाके आता पुन्हा रुतली आहेत. मुंबई-पुण्यासह विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रवास टाळण्याकडे प्रवाशांचा कल आहे. याचा मोठा फटका ट्रॅव्हल्स व्यवसायाला बसला आहे.
कोरोनाचा संसर्ग ओसरताच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एसटी सुरू होण्यापूर्वी ट्रॅव्हल्स धावायला लागल्या. रेल्वे बंद असल्याचा फायदा ट्रॅव्हल्सला मिळाला. गेल्या तीन-चार महिन्यांत या व्यवसायाला सूर गवसला होता. मुंबई, पुणे, नागपूर, अैारंगाबाद, नांदेड, सोलापूर, लातूर यासह बंगलोर, मंगलोर, बेळगावकडे गाड्यांचा ओघ सुरू झाला होता. सांगली-मिरजेतून दररोज ५५ गाड्या धावत होत्या.
पंधरवड्यापासून याला खो बसला आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील प्रवासी संख्या झपाट्याने खालावली. विशेषत: नागपूरच्या गाड्यांना ब्रेक लागला. तेथे कोरोना संसर्ग वाढू लागल्याने तसेच लॉकडाऊनच्या संकेतांमुळे प्रवाशांनी प्रवास थांबविला. त्यानंतर मुंबई व पुण्याच्या गाड्या रिकाम्या होऊ लागल्या. आता जेमतेम दहा ते पंधरा गाड्या धावत आहेत. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या प्रवासी न मिळाल्याने ऐनवेळेस रद्द कराव्या लागत आहेत. डिझेलचे दर वाढल्याने दहा-पंधरा प्रवाशांवर गाडी पळविणे परवडत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
कर्नाटककडे जाणाऱ्या गाड्यांनाही महिन्याभरापासून ब्रेक लागला आहे. कर्नाटकात प्रवेशापूर्वी कोरोना चाचणी प्रमाणपत्र द्यावे लागते, त्यामुळे प्रवासी घटल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. विेशेषत: बंगलोर व मंगलोरला जिल्ह्यातून बरेच प्रवासी जायचे. या सर्वांनी आता प्रवास स्थगित केला आहे.
चौकट
धावणारी चाके पुन्हा रुतली
जानेवारीपासून ट्रॅव्हल्स व्यवसायाने जम धरला होता. चाके फिरू लागली होती. नोकरी, व्यवसाय-उदीम आणि लग्नकार्यांच्या निमित्ताने प्रवासी ट्रॅव्हल्सकडे येत होते. ही संख्या आता झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: विदर्भात संपूर्ण लॉकडाऊन कधीही जाहीर होण्याच्या भीतीने प्रवासी तिकडे जायला तयार नाहीत. या स्थितीत गाड्या पार्किंगमध्ये लावण्याशिवाय व्यावसायिकांना पर्याय राहिलेला नाही.
पॉईंटर्स
कोरोनाआधी बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या - ५५
सध्याची संख्या - १५
कोट
सूर धरलेल्या व्यवसायाने पुन्हा मान टाकली आहे. कोरोना कमी झाल्याने प्रवासी येऊ लागले होते. आता दिवसभरात अर्ध्या गाडीचे प्रवासीही मिळत नाहीत. आठवड्यातून एखादी-दुसरी गाडी निघते. रुग्णसंख्या वाढतच असल्याने पुन्हा लॉकडाऊन व धंदा बंद राहण्याची भीती आहे.
- राहूल मोरे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक
- गेल्या वर्षी नवी गाडी घेतली होती, त्यानंतर महिन्याभरातच लॉकडाऊन सुरू झाले. बॅंकेचे कर्जफेडीचे हप्ते भरेपर्यंत दिवाळे निघायची वेळ आली. या सिझनला थोड्याफार व्यवसायाची आशा होती; पण कोरोना फैलावत असल्याने धंदा पुन्हा बसला आहे. लग्नसोहळ्यांवरील निर्बंधांचाही फटका बसला आहे. दररोजच्या खर्चापुरतेही उत्पन्न मिळेना झाले आहे.
- आप्पासाहेब खरात, ट्रॅव्हल्स व्यावसायिक
- सर्वाधिक व्यवसाय असणाऱ्या मुंबई, पुणे, अैारंगाबाद व बंगलोर शहरांच्या फेऱ्या बंद झाल्या आहेत. प्रत्येक गाडीला दहा-पंधरा प्रवासी घेऊन जाणे परवडत नाही. डिझेलचे दर वाढल्यानेही व्यवसाय हाताबाहेर चालला आहे. दोन महिन्यांपासून जम बसू लागला होता. आता पुन्हा गेल्यावर्षीच्या मार्चसारखी स्थिती निर्माण होऊ लागली आहे.
- केशव राव, ट्रॅव्हल्स व्यावसायिक संघटना