विटा : गुजरात येथून व्यवसायासाठी विटा येथे गेल्या दोन पिढ्यांपासून स्थायिक असलेल्या पटेल कुटुंबीयांवर कोरोनाने मोठा घाला घातला आहे. उद्योजक पटेल कुटुंबातील परबत केसरा पटेल (वय ६५) यांचा गेल्या आठ दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर बुधवारी त्यांचा मुलगा राजेश परबत पटेल (वय ४१) यांचेही कोरोनाने निधन झाले. आठ दिवसांत उद्योजक पटेल कुटुंबातील दोन कर्ते सदस्य गेल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
विटा येथील लेंगरे-साळशिंगे रस्त्यावरील पटेल सॉ मिलचे मालक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते परबतभाई पटेल यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा कोरोना चाचणी अहवाल गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. उद्योजक परबत पटेल व त्यांचा मुलगा राजेश यांच्यावर विटा येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते; परंतु गेल्या आठ दिवसांपूर्वी परबत पटेल यांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा राजेश यांच्यावर खासगी कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी सकाळी राजेश यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ दिवसांत राजेश यांचाही मृत्यू झाल्याने पटेल कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
गेल्या दोन पिढ्यांपासून विटा शहरात स्थायिक असलेले परबत पटेल बापूजी या नावाने सर्वत्र परिचित होते. त्यांनी भांबर्डे येथे गोशाळा सुरू केली आहे, तर त्यांचा मुलगा राजेश हे सॉ मिल व्यवसायासह फर्निचर दुकान सांभाळत होते. कोरोनामुळे अवघ्या आठ दिवसांच्या अंतरात उद्योजक पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने विटा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
फोटो - १६०६२०२१-विटा-परबत केसरा पटेल, विटा.
फोटो - १६०६२०२१-विटा-राजेश परबत पटेल, विटा.