सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना महापालिकेत येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या ऐवजी ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
दैनंदिन कामकाजाच्या वेळेत नगरसेवक, पदाधिकारी यांना भेटण्यासाठी तसेच अधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या निमित्ताने महापालिका कार्यालयांमध्ये वर्दळ सुरू असते. सध्या गर्दी टाळणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने विविध कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी न येण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.
आयुक्त नितीन कापडणीस यांनी दोन्ही उपायुक्त, सर्व प्रभाग समिती कार्यालय, माहिती अधिकार कक्ष तसेच इतर विभागांतील सर्व टपाल शाखेत, बारनिशी विभागात थेट पत्रव्यवहार, अर्ज किंवा निवेदन स्वीकारणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या ई-मेलवर अर्ज किंवा पत्रव्यवहार सादर करावा, असे आवाहन केले आहे.