लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : एकीकडे कोरोनाने निर्माण झालेल्या आर्थिक व आरोग्याच्या अडचणी, दुसरीकडे मोबाइलवेड यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. निद्रानाश, चिंता, तणाव, चिडचिड अशा अनेक विकारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
मानवी जीवनासाठी अन्न, पाणी तसेच शुद्ध हवेबरोबरच झोपही अत्यंत महत्त्वाची असते. झोप व मेंदू यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. त्यामुळे मेंदूचे कार्य बिघडले अथवा त्यावर अनावश्यक ताण आल्यास झोपेचे चक्रही बिघडते. निसर्गाच्या घड्याळाशी आपल्या जीवनशैलीशी फारकत हे याचे प्रमुख कारण आहे. कोरोना काळात जीवनशैलीचे चक्र बिघडले आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे. त्यातून चिंता, निद्रानाश या गोष्टी जखडल्या गेल्या आहे. या काळात मोबाइलचा वापर अधिक वाढला आहे. त्यानेही या तणावात व शारीरिक व्याधीत भर टाकली आहे. गरजेपेक्षा अधिक मोबाइल वापर टाळावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
चौकट
झोप पुरेशी न झाल्यास तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. झोप न झाल्याने हृदयरोग, रक्तदाब (ब्लडप्रेशर) आणि मधुमेहाचा (डायबिटीज) धोका निर्माण होऊ शकतो. व्यक्तीचं शरीर प्री-डायबेटिक अवस्थेमध्ये जाऊ शकते. शरीराची रक्तातील ग्लुकोज स्तर नियंत्रण करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. वजन वाढू शकते.
चौकट
झोप का उडते
जागतिक स्तरावर झालेल्या संशोधनानुसार मोबाइलच्या रेडिओफ्रिक्वेन्शी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डचा परिणाम झोपेवर होतो. शांत झोप लागण्यास या लहरी बाधा आणतात. याशिवाय निद्रानाश विकारही उद्भवू शकतो.
चिंता, तणाव, जीवनशैलीतील बदल या गोष्टींमुळेही झोप उडते.
जंक फुड्स खाणे, कोल्ड्रिंक्सचे सेवन अशाप्रकारच्या अयोग्य आहारामुळे, अतिमद्यपानामुळेही झोपेवर परिणाम होत असतो. त्यामुळे योग्य आहार, योग्य सवयी महत्त्वाच्या आहेत.
चौकट
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको
सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बहुतांश औषध दुकानांमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या जात नाहीत, मात्र तरीही अनेकजण ओळखीने किंवा अन्य मार्गाने अशा गोळ्यांचा वापर करीत असतात. त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांच्याच सल्ल्याने झोपेची गोळी घ्यावी, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
चौकट
नेमकी झोप किती हवी
नवजात बालक १४ ते १७
१ ते ५ वर्षे १० ते १४
शाळेत जाणारी मुले ९ ते १२
२१ ते ४० ७ ते ८
४१ ते ६० ७ ते ८
६१ पेक्षा जास्त ७ ते ९
चौकट
चांगली झोप यावी म्हणून
संशोधकांच्या मते झोपण्यापूर्वी ९० मिनिटे मोबाइल, लॅपटॉप, संगणक आदी उपकरणे हाताळू नयेत.
मोबाईल किंवा रेडिएशन तयार करणारी उपकरणे झोपताना बेडपासून दहा फुटांपेक्षा अधिक अंतरावर ठेवावीत
चांगला आहार ठेवताना व्यवसनांपासून दूर रहावे.
नित्य व्यायाम करावा, मानसिक आरोग्य चांगले ठेवावे.
कोट
वास्तविक मोबाइलच्या अतिवापराने झोपेवर परिणाम होतो. ही उपकरणे जवळ घेऊन झोपणेही तितकेच धोकादायक आहे. निद्रानाश, डोळ्यांचे विकार, मानसिक अस्वस्थता अशा गोष्टींचा सामना यामुळे करावा लागतो. त्यामुळे गरजेपुरता मोबाइल वापरावा
- डॉ. सुरेश पाटील, सांगली
कोट
योग्य आहार, व्यायाम याबरोबरच पुरेशी झोप अत्यंत महत्त्वाची आहे. पुरेशी झोप असेल तर रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. मोबाइलचा गरजेपुरता वापर करावा. अतिरेक टाळावा.
- डॉ. किरण गोंधळी, सांगली