कोरोना रुग्ण मुंबईत, प्रतिबंधित क्षेत्र सांगलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:51+5:302021-03-27T04:27:51+5:30

सांगली : कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण मुंबईत, तर प्रतिबंधित क्षेत्र मात्र सांगलीत, असा प्रकार शुक्रवारी शहरातील मीरा हौसिंग सोसायटी परिसरात ...

Corona patient in Mumbai, restricted area Sangli | कोरोना रुग्ण मुंबईत, प्रतिबंधित क्षेत्र सांगलीत

कोरोना रुग्ण मुंबईत, प्रतिबंधित क्षेत्र सांगलीत

googlenewsNext

सांगली : कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण मुंबईत, तर प्रतिबंधित क्षेत्र मात्र सांगलीत, असा प्रकार शुक्रवारी शहरातील मीरा हौसिंग सोसायटी परिसरात घडला. त्यातही रुग्णांचे नातेवाईक वास्तवास असलेल्या अपार्टमेंटऐवजी दुसऱ्याच अपार्टमेंटच्या भिंतीवर प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावण्यात आला. शिवाय हा फलक कोणी लावला, याचे कोडेही महापालिकेच्या आरोग्य विभागाला पडले होते.

महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या गोंधळाचा नमुना शुक्रवारी शहरात पाहायला मिळाला. कोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या घरावर प्रतिबंधित क्षेत्र असा फलक लावला जात आहे. त्यानुसार मीरा हौसिंग सोसायटी परिसरातील अपार्टमेंटवर फलक लावण्यात आला. त्यामुळे अपार्टमेंटमधील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. कोणाच्या घरात रुग्ण सापडला, याची चाचपणी नागरिकांनी केली असता, त्या अपार्टमेंटमध्ये कोणीच रुग्ण नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्याशी संपर्क साधला. ठोकळे तेथे आले. आरोग्य विभागाला दूरध्वनी करून माहिती घेतली, तर रुग्ण सापडला एका ठिकाणी, मात्र फलक लावलेले अपार्टमेंट दुसरेच होते. दुसऱ्या अपार्टमेंटमधील एकजण कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. पण तो सांगलीत नसून, मुंबईतच वास्तव्यास असतो. त्याच्या आधारकार्डवर सांगलीचा पत्ता आहे. त्यामुळे कदाचित अपार्टमेंटला प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावला गेला असावा, असा समज झाला. त्यानंतर हा फलक आरोग्य विभागाने लावला नसल्याचे समजले. त्यामुळे तो नेमका लावला कोणी, याचे उत्तर दिवसभरात मिळाले नव्हते.

चौकट

फलक हटविण्याची मागणी

दरम्यान, नगरसेवक ठोकळे यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांनी दूरध्वनी करून या प्रकाराची माहिती दिली. अपार्टमेंटवरील फलक हटविण्याची मागणीही त्यांनी केली.

Web Title: Corona patient in Mumbai, restricted area Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.