सुरेंद्र दुपटे
संजयनगर/सांगली : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास बेड उपलब्ध होत नसल्याने हताश झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकाला ढसाढसा रडून मदतीसाठी रस्त्यावरील लोकांकडे याचना करावी लागत आहे. ही बाब निदर्शनास येताच आमदार सुधीर गाडगीळ यांचे स्विय सहाय्यक अमोल कणसे यांनी या रुग्णास कुपवाड मधील संजीवनी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करुन देऊन माणूसकीचं दर्शन घडवलं. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोरील सांगली-मिरज रोड वर सकाळी ११.१५.वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी नगरसेवक शेखर इनामदार उपस्थित होते.
विमल आप्पासाहेब पवार (रा. खटाव बोन्द्री) यांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं, त्यांच्या मुलानं त्यांना मालवाहतूक रिक्षामधून मिरजेला आणलं, पण बेड उपलब्ध नसल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेतलं नाही. तेव्हा त्यांनी रिक्षा सरळ सांगलीत न्यायची ठरवली, त्याप्रमाणं सागलीला जात असतानाच रुग्णाला त्रास होऊ लागल्याने विश्रामबाग परिसरातील आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर रिक्षा थांबवण्यात आली.
रुग्णाच्या महिलेचा मुलगा रडत रडत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे मदतीसाठी याचना करू लागला. तेंव्हा ही बाब आमदार गाडगीळ यांचे स्विय सहाय्यक अमोल कणसे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यांची विचारपूस करुन, कुपवाडमधील संजीवनी हॉस्पिटलमध्ये सोय करुन देत या अत्यवस्थ रुग्णाला वेळीच औषधोपचार उपलब्ध करुन देऊन माणूसकीचं दर्शन घडवलं.