कडेगाव : कोतीज (तालुका कडेगाव) येथील मुंबईस्थित ५५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. याशिवाय येतगाव येथील चार जणांचे कोरोना चाचणी अहवालही दुसऱ्यांदा निगेटीव्ह आले आहेत. कडेगाव तालुक्यात प्रशासनाची सतर्कता, आरोग्य विभाग व पोलिसांची कर्तव्य दक्षता यामुळे कोरोना हरतोय असे दिलासादायक चित्र दिसत आहे. मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या कोतीज (तालुका कडेगाव) येथील ५५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असल्याचे तालुका प्रशासनास ३ एप्रिलला (रविवारी) समजले.
यापूर्वी या कोरोना बाधित व्यक्तीच्या दोन मुली, पुतण्या व पुतण्याची पत्नी व पुतण्याचा मुलगा असे पाच जण अनधिकृत प्रवास करून गुरुवार, दि २३ एप्रिलरोजी सकाळी कोतीज गावात आले होते. यामुळे प्रशासनाने मुंबईहून आलेल्या पाच जणांसह त्यांच्या कोतीज येथील कुटुंबातील अन्य सहा अशा ११ जणांना तात्काळ संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
सांगली येथील वैद्यकीय पथकाने या ११ व्यक्तींचे 'स्वॅब' दि. ५ मे रोजी तपासणीसाठी घेतले होते. आता या ११ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. याशिवाय कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे नोकरीस असलेल्या व कराड येथे वास्तव्यास असलेल्या येतगाव येथील ३५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले होते.
ती व्यक्ती येतगाव येथे एक दिवस मुक्काम करून गेल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या चौघांना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्या चौघांचा किरोना चाचणी अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आला आहे.
यापूर्वी खेराडे वांगी येथील ३२ जणांचे कोरोना तपासणी अहवाल दोन्ही वेळा निगेटीव्ह आले आहेत. यामुळे खेराडे (वांगी), येतगाव, कोतीजसह कडेगाव तालुक्याला दिलासा मिळाला आहे.