मिरजेच्या उरूसापुढे कोरोना व्हायरसचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 03:25 PM2020-03-06T15:25:05+5:302020-03-06T15:26:36+5:30
कोरोना साथीमुळे जिल्ह्यातील जत्रा-यात्रा आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम संकटात सापडले आहेत. मिरजेच्या उरूसासह गर्दीचे सर्व कार्यक्रम स्थगित ठेवण्याचे किंवा पुढे ढकलण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. महिला दिनानिमित्त ८ मार्चला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात, त्यांच्याही फेरविचाराचे आवाहन केले आहे.
सांगली : कोरोना साथीमुळे जिल्ह्यातील जत्रा-यात्रा आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम संकटात सापडले आहेत. मिरजेच्या उरूसासह गर्दीचे सर्व कार्यक्रम स्थगित ठेवण्याचे किंवा पुढे ढकलण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. महिला दिनानिमित्त ८ मार्चला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात, त्यांच्याही फेरविचाराचे आवाहन केले आहे.
जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्ह्यातील कोरोना स्थितीविषयी माहिती दिली. लक्षणे, घ्यावयाची काळजी याच्याही सूचना केल्या. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन असे कार्यक्रम टाळण्याची सूचना केली.
मिरजेत २० मार्चपासून मीरासाहेब दर्ग्याचा उरूस सुरु होतो. त्यासाठी देशभरातून भाविक, व्यावसायिक व कलाकार येतात. अगदी आखातातूनही भाविक हजेरी लावतात. हे पाहता उरूस पुढे ढकलणे किंवा स्थगित करणे शक्य आहे काय, यावर बैठकीत चर्चा झाली.
मुंबईत गुुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्य सचिवांनी गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे ८ मार्चच्या महिला दिनाच्या सर्व कार्यक्रमांवरही संकट आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा परिषदेतील बैठकीदरम्यान सभा, संमेलने, शिबिरे, कार्यशाळा असे कार्यक्रम संयोजकांनी पुढे ढकलावेत, अशी सूचना केली आहे.