सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना पॉझिटिव्ह, पण लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच विलगीकरण करून उपचार करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. त्याबाबत लवकरच नियमावली तयार केली जाईल, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.कापडणीस म्हणाले की, जुलै महिन्यात महापालिका क्षेत्रात कोरोनाची संख्या वाढली आहे. रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी तीन खासगी रुग्णालयांतही सोय केली आहे. त्याशिवाय क्वारंटाईन कक्षाचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. विद्यार्थी वसतिगृहांचे अधिग्रहणही केले जात आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या आहेत.महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४६० रुग्ण आढळून आले आहेत. वाढता संसर्ग पाहता, महापालिकेने कंटेनमेंट झोनमधील ५० वर्षावरील व्यक्ती व आजार असलेल्या व्यक्तींची अँटिजेन रॅपिड चाचणी सुरू केली आहे. आतापर्यंत सातशेहून अधिक नागरिकांची चाचणी करण्यात आली असून २२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ३५० खाटा शिल्लक आहेत. भविष्यात रुग्णांची संख्या वाढल्यास, लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच विलगीकरण करून उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याशीही चर्चा झाली आहे.परराज्यातील व राज्यातील महापालिकांनी केलेल्या नियमावलीची माहिती मागविली आहे. ती उपलब्ध होताच घरी उपचार करण्याबाबतची नियमावली तयार केली जाणार असल्याचे कापडणीस यांनी सांगितले.