डॉ. मनीषा भोजकर, हुपरी
एखाद्याला कोरोना झाला म्हणजे तो किंवा त्याचे कुटुंबीय गुन्हेगार ठरत नाहीत. त्यांच्यापासून सोशल डिस्टन्सिंग म्हणजे वाळीत टाकायला हवं, असंही नाही. त्यांच्याशी फोनवरून संवाद साधा. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत त्यांना शक्य तितकी मदत करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिलासा द्या, बरे होण्याचा विश्वास द्या. मदतीचा अर्थ प्रत्येक वेळेस आर्थिक मदत असा नसतो. तुमचे आपुलकीचे आणि विश्वासाचे शब्दही कोरोनामधून बाहेर पडण्यासाठी निश्चितपणे मदत करू शकतात.
कोरोनामुळे वैद्यकीय खर्चाच्या नियोजनाचा विषय प्राधान्याने घरोघरी चर्चेला आला, हे या आपत्तीचे फलितच मानावे लागेल. आरोग्य विम्याची गरजही अधोरेखित झाली. आपण भारतीय आर्थिक नियोजनात नेहमीच मागे पडतो. राष्ट्रीय पातळीवर आपत्ती व्यवस्थापन दल असते, तसे घरातही हवे. वैद्यकीय खर्चाची तरतूद प्राधान्यक्रमावर हवी. एरवी लग्न, मुंज, बारसे, वाढदिवस यावर लाखो रुपयांची उधळपट्टी करतो. गाड्या, विविध गॅझेट्ससाठीही भरमसाट खर्च करतो, पण वैद्यकीय बिले भरताना मात्र घाम फुटतो. ही मानसिकता बदलण्याची संधी कोरोनाने दिली आहे.
वैद्यकीय व्यवस्था कितीही सुसज्ज असली तरी, हजारो कोरोना रुग्णांमुळे कोलमडायला वेळ लागत नाही. जगातील कोणतीही यंत्रणा अशी परिस्थिती हाताळू शकत नाही. त्यामुळे वैद्यकीय व्यवस्थेला दोष देण्याचे थांबवूया. मास्कच्या वापराने कोरोना पंधरवड्यात आटोक्यात येण्याचा विश्वास संसर्गजन्य रोगप्रतिबंधक संस्थेला आहे, त्याचे अनुकरण करूया.
वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, विनाकारण घरातून बाहेर न पडणे, तातडीचे नसणारे घरगुती कार्यक्रम पुढे ढकलणे असे उपाय करायला हवेत. कोरोनाच्या लक्षणांमध्ये व्यक्तिपरत्वे भिन्नता आढळते. सौम्य लक्षणाचे रुग्ण घरीच राहून बरे होतात, पण पुढे गैरसमज पसरविण्याचे काम ही मंडळी करतात. मला कोरोनाने काहीच त्रास झाला नाही, अशी वक्तव्ये करतात. त्यामुळे बेफिकिरी वाढते. काही लोक वेगवेगळे संदेश, व्हिडिओ टाकून, कोरोना म्हणजे मृत्यू... अशी भीती निर्माण करतात. अशी बेफिकिरी आणि टोकाची भीती यांचा समन्वय साधत कोरोनाचा सामना करायचा आहे.
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ व समुपदेशक आहेत.)