लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरात कोरोनाचे ४०९ पेक्षा जास्त रुग्ण असून, यातील ५० टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, २० ते २२ रुग्ण मृत्यू पावले आहेत. शहरात दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. शहराचा मृत्युदर पाच टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने तो कमी करण्याचे आव्हान पालिका प्रशासन, रुग्णालय व पदाधिकाऱ्यांपुढे आहे.
आष्टा शहरात गतवर्षी कोरोना आल्यानंतर शहरातील नगरपालिका प्रशासन, ग्रामीण रुग्णालय, राजकीय पदाधिकारी, सामाजिक सेवाभावी संस्था, बँका, पतसंस्था, पोलीस, व्यापारी यांनी एकत्र येऊन सर्वांना आधार दिला. पालिका आणि पोलिसांनी शहरात कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करीत जंतुनाशक औषध फवारणी केली होती. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर वाटप केले. ग्रामीण रुग्णालयाने या परिसरात ट्रेसिंग केले. शहरातील सर्व १० प्रभागात पालिका अधिकारी, नगरसेवक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, समाजसेवक व पत्रकार यांची समिती नेमण्यात आली. या समितीच्यावतीने शहरात काम सुरू असतानाच कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आणि या समित्याही गायब झाल्या.
सध्या आष्टा शहरात चारशेवर रुग्ण आहेत. पालिका प्रशासन व रुग्णालय रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, ते अपुरे ठरत आहेत. शहराचा मृत्युदर पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शहराची लोकसंख्या सुमारे ४० ते ४५ हजारांच्या दरम्यान आहे. सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालयाला परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा वर्कर्सची साथ मिळणे गरजेचे आहे.
आता पालिका बिरोबा मंदिर भक्तनिवासात कोरोना केअर सेंटर सुरू करणार आहे. ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरसह स्पंदन हॉस्पिटल, कृष्णामाई हॉस्पिटल, क्रिटिकेअर हॉस्पिटल, डांगे हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील काही मोजके पदाधिकारी व सामाजिक संस्था वगळता गतवर्षीप्रमाणे पदाधिकारी व नागरिक बँका, संस्था कोरोना संकटात मदतीसाठी पुढे येताना दिसत नाहीत. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या, तसेच मृत्यूचे प्रमाण पाच टक्क्यांवरून कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
चौकट -
लढाई एकत्रितपणे लढण्याची अपेक्षा
आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांच्यासह पालिका प्रशासन, ग्रामीण रुग्णालय यांनी विलासराव शिंदे गट व जयंत पाटील गटातील कार्यकर्त्यांना व सर्व विरोधकांना, सामाजिक संस्था, समाज सेवक, डॉक्टरांना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई एकत्रितपणे लढावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.