CoronaVirus Lockdown : सांगलीचे व्यापारी बंडाच्या पावित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 03:02 PM2020-05-07T15:02:59+5:302020-05-07T15:07:17+5:30
राज्य शासनाने रेड झोन वगळता इतर ठिकाणची दुकाने सुरू करण्यास मान्यता दिली असतानाही जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसांत बाजारपेठेतील १०० टक्के दुकाने सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नाही तर सोमवारनंतर व्यापारी स्वत:हून दुकाने उघडतील, असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी गुरुवारी दिला.
सांगली : राज्य शासनाने रेड झोन वगळता इतर ठिकाणची दुकाने सुरू करण्यास मान्यता दिली असतानाही जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसांत बाजारपेठेतील १०० टक्के दुकाने सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नाही तर सोमवारनंतर व्यापारी स्वत:हून दुकाने उघडतील, असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी गुरुवारी दिला.
जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री, स्थानिक आमदार, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व्यापाºयांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. शहा म्हणाले की, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगरसह विविध शहरातील व्यापारपेठा सुरू झाल्या आहेत. पण सांगलीतील बाजारपेठ सुरू करण्यास मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
प्रशासनाला केवळ बाजारपेठेत गर्दी दिसते का? सध्या रस्त्यावर लोक गर्दी करून आहेत. जी दुकाने उघडली आहेत तिथेही गर्दी आहे. मग त्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होत नाही का? असा सवालही त्यांनी केला. शहरातील व्यापाऱ्यांची अवस्था बिकट आहे.
किमान सवलत मिळाल्यास घरखर्च आणि कामगारांचे पगार देता येतील. इतर शहरात दुकाने सुरू करण्याचा निर्णय तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्या आदेशाची प्रतही प्रशासनाला दिली. पण त्यावर साधी चर्चा करण्याचीही त्यांची तयारी नाही.
बाजारपेठा न उघडण्यामागे काही राजकारण आहे का? जिल्ह्याचे अर्थकारण रुळावर आणण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. पण ती ते पार पाडत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. येत्या तीन दिवसात जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडण्याबाबत निर्णय न घेतल्यास सोमवारनंतर व्यापारी दुकाने उघडतील. प्रशासनाने अवश्य गुन्हे दाखल करावेत, असेही आव्हानही त्यांनी दिले.
व्यापाऱ्यांना वाली कोण? शहरातील व्यापाऱ्यांना कोणीच वाली नाही. स्थानिक आमदार, खासदार लक्ष देण्यास तयार नाही. पालकमंत्री व इतर राजकीय पक्षांचे नेत्यांकडे वेळ नाही. जिल्हा प्रशासनाकडून चांगली वागणूक मिळत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांत प्रचंड असंतोष आहे.
- समीर शहा, अध्यक्ष,
व्यापारी एकता असोसिएशन
संघटनेची मागणी
- शंभर टक्के दुकाने उघडण्यास परवागनी द्यावी
- व्यापाºयांच्या कर्जावरील एक वर्षाचे व्याज माफ करावे
- कर्जाचे हप्ते भरण्यासाठी एक वर्षाची मुदत द्यावी
- व्यवसायिक घरपट्टी, पाणीपट्टी, विजबील माफ करावे
- राज्यात रेडझोनमध्येही दुकाने सुरू आहेत, मग सांगलीत का नाही? याचे उत्तर द्यावे