CoronaVirus News: कोरोना रुग्णांसाठी शासनाकडून निधी मिळत असल्याची निव्वळ अफवाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 12:56 AM2020-07-24T00:56:49+5:302020-07-24T06:23:40+5:30
कोरोना रूग्णामागे प्रत्येकी दीड लाख, तर कंटेनमेंट झोनसाठी पाच लाख रूपये मिळत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.
सांगली : शासनाकडून कोरोना रूग्णांसाठी ठराविक निधी मिळत आहे, अशा चर्चेने सोशल मीडियावर जोर धरला आहे. मात्र, असे काहीही नसून शासनाकडून एकूण कोरोना नियंत्रण व त्यावरील उपाययोजनांसाठी निधी मिळत आहे. ठराविक रूग्णसंख्येला रक्कम मिळत असल्याची निव्वळ अफवा आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. कोरोना रूग्णामागे प्रत्येकी दीड लाख, तर कंटेनमेंट झोनसाठी पाच लाख रूपये मिळत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकाऱ्यांनी, ही चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगितले.
डॉ. चौधरी म्हणाले, महसूल, आरोग्य, महानगरपालिका, नगरपालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करण्यात येत आहे. यासाठी आतापर्यंत १० कोटी २० लाखांचा निधी मिळाला आहे, तर आणखी ४ कोटींची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात होणाºया विकास कामांवरील काही निधीही कोरोनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार डीपीडीसीतून साडेसात कोटींचा निधी मिळाला आहे.
अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई
सोशल मीडियावर कोरोना रूग्णामागे दीड लाख रूपये मिळतात, अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत आहे. हा पूर्णपणे खोडसाळपणा असून या आशयाची पोस्ट टाकणारे व अफवा पसरविणाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.