देवराष्ट्रे :
कृष्णा कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी ५ नोव्हेंबर २०२० रोजी एका कंपनीला एम ३० ग्रेडची साखर ३१०० रुपये दराने विकली. याच दिवशी याच ग्रेडची साखर जयवंत शुगर्सने ३२५० रुपये दराने विकली. याचा अर्थ काय, असा सवाल करीत संस्थापक पॅनलचे नेते अविनाश मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सभासदांसमोर सादर केले.
आसद (ता. कडेगाव) येथे संस्थापक पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पॅनलप्रमुख अविनाश मोहिते बोलत होते. यावेळी संस्थापक पॅनलचे उमेदवार माणिकराव मोरे उपस्थित होते. मोहिते म्हणाले की, संबंधित
कंपनीकडून कृष्णा कारखान्याला ३१७५ रुपये दर मिळाला असता, तर जयवंत शुगर्सचा दरही ३१७५ रुपये घ्यावा लागला असता. परंतु,
भ्रष्टाचाराची परंपरा असलेल्या भोसलेंनी
कृष्णा कारखान्याचा साखर विक्रीदर ७५ रुपयांनी कमी केला आणि जयवंत शुगर्सचा साखर विक्रीदर ७५ रुपयांनी वाढवला. अशा प्रकारे १५० रुपयांची तफावत करून साखरविक्रीत मोठा भ्रष्टाचार केला आहे. अशा भ्रष्ट सहकार पॅनलला धडा शिकविण्याची वेळ आली आहे.
यावेळी जयेश मोहिते, संतोष माने, अप्पासाहेब जाधव, तानाजी जाधव, संदेश जाधव, भास्कर जाधव, अशोक जगताप उपस्थित होते.