सांगली : विद्युत वाहिनीवर हुक टाकून वीजचोरी केल्याप्रकरणी सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथील एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप शहाजी चव्हाण (वय ४०) असे त्याचे नाव आहे. महावितरणच्या अधिकारी प्रियांका प्रवीण वसावे यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप चव्हाण हा सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथे राहण्यास आहे. त्याची स्वतःची दुधाची डेअरी आहे. तेथील महावितरणच्या लघुदाब विद्युत वाहनीवरून तो वीजचोरी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तपासणी केली असता, वाहिनीवर आकडा आढळून आला. स्वतःच्या फायद्यासाठी मीटरद्वारे वीज न घेता चोरी करत असल्याचे समोर आले. मागील तीन महिन्यांचे एक लाख ४१ हजार आणि तडजोड रक्कम ५९ हजार ४०० अशी एकूण दोन लाख चारशे रुपयांची वीजचोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संदीप चव्हाण याच्यावर भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक तपास करत आहेत.