कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सागर रेवजी विश्वासराव (वय ४०) यांना शिवीगाळ व धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुपवाड शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्यासह दोघांविरोधात रविवारी रात्री कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र व्हनकडे व त्याचा वाहन चालक ऋषिकेश व्हनकडे अशी त्यांची नावे आहेत.
रविवारी दुपारी सागर विश्वासराव व त्यांचे सहकारी मिरज एमआयडीसीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी एका पेट्रोल पंपासमोरील (एमएच १० ए. क्यू. ५०४७) मोटार अडवली. वाहनचालक ऋषिकेश व्हनकडे यांच्याकडे वाहनाची कागदपत्रे व वाहन चालविण्याचा परवाना कागदपत्रांची मागणी केली.
व्हकडे याने कागदपत्रे व वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे सांगितले. यानंतर ते वाहन सावळीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आणून मशीनद्वारे पासिंगची मुदत तपासून पाहिली असता ती संपली असल्याचे दिसले. अधिकाऱ्यांनी मशिनद्वारे ई- चलन करून व्हनकडे यास दिले असता, त्याने ई-चलन घ्यायचे नाकारून वाहन मालक जितेंद्र व्हनकडे यास फोन लावून दिला.
व्हनकडे याने विश्वासराव यांना फोनवरून शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच ऋषिकेश हा विश्वासराव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर धाऊन गेला. तसेच ई-मशीन हिसकावून घेऊन त्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वाहन निरीक्षक विश्वासराव यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तपास सहायक पोलीस फौजदार युवराज पाटील करीत आहेत.