होम आयसोलेशनचे उल्लंघन करणाऱ्या पाचजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:36+5:302021-04-13T04:25:36+5:30
सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असतानाच पॉझिटिव्ह असूनही नियमांचे पालन करणाऱ्यांवर आता थेट कारवाई करण्यात येत आहे. गृह ...
सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असतानाच पॉझिटिव्ह असूनही नियमांचे पालन करणाऱ्यांवर आता थेट कारवाई करण्यात येत आहे. गृह अलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, अशी सूचना पालकमंत्र्यांनी करूनही त्याचे उल्लंघन करणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
गेडाम यांनी सांगितले की, जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाकडून नियम काही करण्यात आले आहेत. विशेषत: गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रूग्णांनी काळजी घेतल्यास संसर्ग वाढणार नाही. मात्र, तरीही अनेक रूग्ण बाहेर फिरून इतरांचा धोका वाढवत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत २,७३४ नागरिक तसेच तीन पोलीस अधिकारी व ८ पोलिसांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी बीट मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गृह अलगीकरणात असलेल्या रूग्णांना भेटून घराबाहेर न पडण्याबाबत सक्त सूचना देण्यात येत आहेत. तरीही हे आदेश न जुमानता बाहेर फिरणाऱ्या सांगली ग्रामीण भागातील १, पलूस येथे २, भिलवडी येथे १, कडेगावमध्ये १ अशा पाचजणांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोट
गृह अलगीकरणात असलेल्या रूग्णांनी नियमांचे पालन करावे. सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत प्रशासनाला सहकार्य करावे. जे रूग्ण नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक