सांगली : कोरोनाचे निदान झाले असतानाही होम आयसोलेशनमध्ये उपचार न घेता बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनास्थिती गंभीर बनत असतानाच कोरोनाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिले आहेत. त्यानुसार होम आयसोलेशनचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाचे निदान झाल्याने घरातच उपचार घेणारे अनेकजण बाहेर फिरत असल्याने त्यांच्या माध्यमातून संसर्गाचा धोका वाढला आहे. सध्या जिल्ह्यात ४०८७ नागरिक, ३ पोलीस अधिकारी तर १० पोलीस कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. त्यातील नियम मोडणाऱ्यांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात इस्लामपूर १४, आष्टा २, विश्रामबाग १, कुरळप २, पलूस ६, कुंडल १, भिलवडी १, कडेगाव २, कासेगाव ३, कोकरूड ३, तासगाव १ अशा गु्न्ह्यांचा समावेश आहे.
चौकट
विना मास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई सुरूच ठेवण्यात आली असून जिल्ह्यात ९४ जणांना ४६ हजार ७०० रुपयांचा दंड करण्यात आला. जिल्हाभरात १०३ दुचाकी, ८ चारचाकी वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला तर १८६ वाहने ताब्यात घेत त्यांना ४५ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला.