मालगाव : मिरज तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सहभाग घेतलेल्या ८० टक्के उमेदवारांनी निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब देण्याकडे फाठ फिरविली आहे. यासाठी १७ फेब्रुवारी अंतिम मुदत आहे. मुदतीत हिशोब न दिल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाईचा इशारा तालुका प्रशासनाने दिला आहे.
तालुक्यात २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीत अर्ज दाखल करून तो मागे घेणाऱ्या व निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी शासनाच्या निर्देशानुसार निवडणूक निकालानंतर ३० दिवसांत खर्चाचा हिशोब देणे बंधनकारक आहे. २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उमेदवारांची संख्या १ हजार १४ होती. १७ फेब्रुवारी ही हिशोब देण्याची मुदत आहे. मुदत संपण्यास काही दिवसांचा अवधी उरलेला असताना आतापर्यंत केवळ २०० जणांनी खर्चाचा हिशोब दिला आहे. उर्वरित सुमार ८१४ उमेदवारांनी हिशोब देण्याकडे पाठ फिरविली आहे.
खर्चाचा हिशोब देण्याबाबत उमेदवारांकडून होत असलेल्या चालढकलीबाबत मिरज पंचायत समितीतील लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बाब तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी याची गांभीर्याने दखल घेतली असून निवडणूक खर्चाचा हिशोब दॆण्यास टाळाटाळ करणाऱ्या उमेदवारांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.
कारवाई टाळण्यासाठी १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतीत उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब पंचायत समितीच्या लेखा विभागाकडे सादर करावा, असे आवाहन लेखा विभाग पथकातील अधिकाऱ्यांनी केले आहे.
चौकट
हिशोब न दिल्यास...
निवडणुकीचा हिशोब ३० दिवसांत द्यावयाचा असताना मिरज तालुक्यातील २० टक्के उमेदवारांनी खर्चाचा हिशोब दिला आहे. उर्वरित ८० टक्के उमेदवारांनी हिशोब दिलेला नाही. वेळेत हिशोब न दिल्यास फौजदारी गुन्ह्याबरोबर पुढील दहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई होणार आहे.