बेशिस्त नागरिकांच्या गर्दीचा बहर, जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:24 AM2021-03-21T04:24:10+5:302021-03-21T04:24:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाकडे कानाडोळा करीत नियमांना ठेंगा दाखवित बेशिस्त नागरिकांनी लग्नकार्य, अंत्यविधी, बाजार, हॉटेल्स याठिकाणी गर्दी ...

Crowds of unruly citizens, Corona's havoc in the district again | बेशिस्त नागरिकांच्या गर्दीचा बहर, जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर

बेशिस्त नागरिकांच्या गर्दीचा बहर, जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाकडे कानाडोळा करीत नियमांना ठेंगा दाखवित बेशिस्त नागरिकांनी लग्नकार्य, अंत्यविधी, बाजार, हॉटेल्स याठिकाणी गर्दी करून कोरोनाला निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम म्हणून नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. कोरोनाचा हा कहर जीवघेणा ठरण्याची चिन्हे असतानाही नागरिकांना त्यांचे गांभीर्य राहिलेले नाही.

प्रशासकीय स्तरावर सुरू असलेले प्रयत्न धुळीस मिळविण्याचे काम पदोपदी सुरू आहे. कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिसताच जानेवारीपासून आजअखेर लोकांनी जमेल त्याठिकाणी नियम मोडण्याचा सपाटा लावला. गर्दीचे कार्यक्रम करून कोरोनाला निमंत्रण देण्यात आले. त्यामुळेच आता कोरोना रुग्णाने दररोजी शंभरी गाठण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ दिवसांत सांगली जिल्ह्यात साडेपाचशे नवे रुग्ण आढळले. वाढत्या रुग्णसंख्येने जिल्हा पुन्हा हादरला आहे. कोरोनाचा होत असलेला हा कहर मोठी हानी करणारा ठरू शकतो.

चौकटी

आठवडा बाजारात नियमांचा बाजार

सांगलीतील शनिवारच्या आठवडा बाजारात शनिवारी प्रचंड गर्दी झाली होती. विनामास्क, सुरक्षित अंतराविना भरलेल्या बाजारात नियमांचा बाजार झाल्याचे दिसून आले. भारती विद्यापीठापासून कापडपेठेपर्यंत व बालाजी चौकापासून मारुती रोडपर्यंत विक्रेत्यांनी व खरेदीदारांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. हीच परिस्थिती माधवनगरच्या शनिवार बाजारात दिसून आली.

स्मशानभूमीतील गर्दी हटेना

सांगली शहरातील विविध जातीच्या, धर्मीयांच्या स्मशानभूमीत ५० लोकांच्या मर्यादेचे पालन होत नाही. शंभर ते पाचशे लोक अंत्यविधीला उपस्थित रहात आहेत. गेली सहा दिवस हे चित्र दिसत आहे.

आठवडाभरातील रुग्णसंख्या

तारीख रुग्ण

१२ मार्च ४३

१३ मार्च ३४

१४ मार्च २०

१५ मार्च ८४

१६ मार्च ८७

१७ मार्च ६४

१८ मार्च ७६

१९ मार्च १८६

चौकट

एकूण उपचाराखालील रुग्ण ६६७

गृहविलगीकरणातील ५२३

रुग्णालयात दाखल १४४

काेट

लोकांनी प्रशासकीय आवाहन गांभीर्याने घ्यावे. उपजीविकेची साधने, सेवा सुरू ठेवल्या असल्या तरी त्या कोरोनाचा नियम मोडण्यामुळे पुन्हा बंद होऊ शकतात. ज्येष्ठांनी व विविध आजारांनी ग्रस्त नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. जिल्ह्यात आजवर एकाही व्यक्तीला लसचा दुष्परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे लसीकरणास व कोरोना नियम पालनास प्रतिसाद द्यावा.

- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी सांगली

कोट

नवी लक्षणे एकाही रुग्णात आढळलेली नाहीत. सध्या बेडची उपलब्धता बऱ्यापैकी आहे. तरीही दहा तालुक्यांमध्ये सध्या कोविड केअर सेंटर्स सुरू केले आहेत. गरज पडली तर पुन्हा खासगी रुग्णालयांचा वापर केला जाऊ शकतो.

- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली

Web Title: Crowds of unruly citizens, Corona's havoc in the district again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.