राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 01:23 PM2020-01-25T13:23:53+5:302020-01-25T13:34:52+5:30
भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हा अमुल्य अधिकार आहे, असे सांगून सशक्त लोकशाहीसाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदार नोंदणी करून सजगतेने निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी केले.
सांगली : भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हा अमुल्य अधिकार आहे, असे सांगून सशक्त लोकशाहीसाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदार नोंदणी करून सजगतेने निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्र. पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. विश्वास माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल आदि उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले, लोकशाहीवर असणारी निष्ठा दृढ करण्यासाठी राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार पार पाडण्याची अमूल्य संधी मिळाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भारताची राज्यघटना जगात श्रेष्ठ असून याव्दारे दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने जागृततेने वापरला पाहिजे.
मतदान न करणे म्हणजे लोकशाहीच्या मंदिरात निष्क्रिय राहिल्यासारखे ठरेल असे सांगून आयुष्यात एकदा तरी राज्यघटना वाचावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोणीही १८ वर्षावरील पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग, प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे नमूद करून आपल्याबरोबर आपले कुटुंबिय, शेजारी, मित्र यांची विचारधारा नकारात्मक असेल, तर ती मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करा. त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये 82 वर्षाचे गोविंद परांजपे यांनी घेतलेला सहभाग लक्ष वेधून घेणारा होता. गोविंद परांजपे यांनी आतापर्यंत सायकल वरून एव्हरेस्टचा पायथा, कन्याकुमारी, जम्मू काश्मिर, लखनौ आदि ठिकाणी प्रवास करून विविध सामाजिक संदेशाबाबत जनजागृती केली आहे याचा विशेष उल्लेख अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी आपल्या भाषणात गौरवाने केला.
न्या. विश्वास माने म्हणाले, मतदान सजगतेने करणे हे मूलभूत राष्ट्रीय कर्तव्य असून लोकशाही प्रक्रियेतील सर्वच निवडणुकांसाठी १०० टक्के मतदान व्हावे. यावेळी त्यांनी विधी सेवा प्राधिकरणामार्फत २६ नोव्हेंबरपासून संविधान जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
प्र. पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले म्हणाल्या, जास्तीत जास्त लोकांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी जागृती करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत असल्याचे सांगून १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले. आभार जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी मानले. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिवस मतदारांसाठीची प्रतिज्ञा देण्यात आली. प्रातिनिधीक स्वरूपात इपिक कार्डांचे वाटप करण्यात आले.
मतदार छायाचित्र यांद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात उल्लेखनीय कामकाज केल्याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा, चित्रकला, निबंध, रांगोळी, वक्तृत्त्व, घोषवाक्य, पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सायकल रॅलीत सहभाग घेतलेले ज्येष्ठ नागरिक गोविंद परांजपे, विलास घारगे, गणेश जोशी यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त यांचा संदेश चित्रफीतीद्वारे दाखवण्यात आला. या कार्यक्रमास विविध अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मतदार जनजागृती सायकल रॅली उत्साहात
दरम्यान राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त स्टेशन चौक सांगली येथून काढण्यात आलेली मतदार जनजागृती सायकल रॅली उत्साहात संपन्न झाली. अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ दिली व मतदार जनजागृती सायकल रॅलीस हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. ही सायकल रॅली स्टेशन चौक ते पुष्कराज चौक व परत स्टेशन चौक येथे रॅलीची सांगता झाली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, सायकलपट्टू दत्ता पाटील, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मतदार जनजागृती सायकल रॅलीलीमध्ये सी. बी. शाह महिला महाविद्यालय सांगली, विलिंग्डन महाविद्यालय सांगली, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, पटवर्धन हायस्कूल सांगली, सांगली हायस्कूल सांगली, दडगे हायस्कूल सांगली, सांगली सायकल असोसिएशन सांगली, नेहरू युवा केंद्र सांगली, के.डब्ल्यू.सी. कॉलेज सांगली, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली, गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स संगली, लठ्ठे पॉलिटेक्नीक सांगली आदि शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, एन.सी.सी. एन.एस.एस. विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच इतर शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.