भिलवडी
: भिलवडी व परिसरात सोमवारी सायंकाळपासून रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडे पडून मोठे नुकसान झाले. रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली. काही ठिकाणी विद्युत खांब वाकले व विद्युत तारा तुटल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.
भिलवडी मौलानानगर परिसरातील एका घरावरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. मंगळवारी सकाळी तलाठी गौसमहंमद लांडगे यांनी पंचनामा केला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवून रात्री उशिरापर्यंत काम करून वीजपुरवठा पुन्हा सुरळीत चालू केला.
तासभर पावसाच्या सरी कोसळल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शेतामध्येदेखील पाणी साचले होते.
धनगाव येथे विजेच्या खांबावर झाडे पडल्याने चार ते पाच खांब मोडले. त्यामुळे सलग चोवीस तास वीज गायब असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम मंगळवारी सुरू होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळ व भाज्यांचेही नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळभाज्यांचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी केली आहे.