सांगली : ५९ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेने तिकीट विक्रीतून तब्बल सत्तर हजारांचा गल्ला जमविला. येथील भावे नाट्यगृहात वीस दिवस चाललेल्या स्पर्धेत सांगली व सातारा जिल्ह्यांतील संस्थांची तेवीस नाटके सादर झाली. सांगलीकर रसिकांनी त्यांना भरभरुन दाद दिली.
नाट्य स्पर्धेत इतका विक्रमी गल्ला जमा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती संयोजक मुकुंद पटवर्धन व सहसंयोजक हरिहर म्हैसकर यांनी दिली. १५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधित स्पर्धा झाल्या. हौशी कलाकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. बहुतांशी नवे कलाकार, नव्या नाट्यसंहिता आणि ग्रामीण भागातील नाट्य संस्थांचा सहभाग, ही यंदाची वैशिष्ट्ये ठरली. एकाही संस्थेचा प्रयोग एनवेळेस रद्द झाला नाही, हेदेखील वैशिष्ट्य मानावे लागेल.
स्पर्धेसाठी दहा आणि पंधरा रुपये तिकीट दर होते. दरवर्षी फुकट्यांची संख्या जास्त असायची. तिकीट खिडकीकडे न जाताच प्रेक्षक नाट्यगृहात घुसायचे. पण यंदा संयोजकांनी तिकीट विक्रीची व्यवस्था थेट प्रवेशद्वारातच केली होती. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षक तिकीट काढूनच आत जात होता. प्रत्येक प्रयोगाची सरासरी प्रेक्षकसंख्या तीनशे ते चारशे इतकी राहिली. तिकीट विक्रीतून सुमारे सत्तर हजार रुपये मिळाले. यातील निम्मी रक्कम शासनजमा झाली, तर उर्वरित नाट्य संस्थांना मिळाली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्योती रावरकर (पुणे), भालचंद्र कुबल (पुणे) व राजेंद्र जाधव (सोलापूर) यांनी काम केले.
स्पर्धेचे परीक्षण सांस्कृतिक संचालनालयाला पाठवले असून दोन दिवसात निकाल जाहीर होईल, असे म्हैसकर म्हणाले. विजेती संस्था राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरेल.
विविधढंगी नाट्यरंगस्पर्धेच्या निमित्ताने हरतºहेचे नाट्यरंग प्रेक्षकांना पाहायला मिळाले. गंभीर, विनोदी, रहस्यमयी, हलकी-फुलकी, सामाजिक संदेश देणारी नाटके सादर झाली. सामाजिक प्रश्नांना हात घालणाऱ्या संवेदनशील कलाकृतींनी प्रेक्षकांना हादरवून सोडले. ‘सल, गेला माधव कुणीकडे, नेक्स्ट, पृथ्वीची टूर रे, रुदाली, गांधी आडवा येतो, पुरुषार्थ, पूर्णविराम, महाशून्य’ या नाट्यकृती लक्षवेधी ठरल्या.
भावे नाट्यगृहाला दिलासास्पर्धा काळात भावे नाट्यगृह पूर्ण दिवस आरक्षित होते. या माध्यमातून सुमारे १ लाख ८० हजार रुपये भाड्यापोटी मिळाले. महापुरात मोठी हानी सोसाव्या लागलेल्या भावे नाट्यगृहासाठी हा मोठा दिलासा ठरला.