जाखापूरच्या डाेंगरास आग; २५ एकर क्षेत्रास बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:50 AM2021-03-13T04:50:36+5:302021-03-13T04:50:36+5:30
शुक्रवारी दुपारी जाखापूरच्या पश्चिमेस असणाऱ्या मुख्य डोंगराला दुपारी १ वाजता आग लागली. डोंगराजवळील वस्तीवर राहणाऱ्या लोकांनी ही आग पाहिली ...
शुक्रवारी दुपारी जाखापूरच्या पश्चिमेस असणाऱ्या मुख्य डोंगराला दुपारी १ वाजता आग लागली. डोंगराजवळील वस्तीवर राहणाऱ्या लोकांनी ही आग पाहिली व सरपंच सूर्यकांत पाटील यांना फोन केला. तातडीने सरपंच पाटील यांनी वनविभागाला माहिती दिली. धनंजय स्पोर्ट्सचे शेकडो कार्यकर्ते मदतीसाठी डोंगरावर धावले. तोपर्यंत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे हवालदार सुभाष पडळकर हे त्या ठिकाणी दाखल झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी फवारणी पंपाने आग विझविण्यास सुरुवात केली. धनंजय स्पोर्ट्सच्या कार्यकर्त्यांनी व वस्तीवरील नागरिकांनी मिळेल तेथील पाणी घेऊन आग विझविण्यास सुरुवात केली. तीन ते चार तासांनंतर आग आटोक्यात आली. सायंकाळी साडेचार वाजता आग आटाेक्यात आणण्यात यश आले.
तोपर्यंत पंचवीस ते तीस हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले होते. यामध्ये छोटे वन्यजीव, छोटे पक्षी काही प्रमाणात मरण पावले. आग लागलेल्या क्षेत्राजवळ लोकवस्ती आहे. येथील शेतकऱ्यांनी मळणी करण्यासाठी ठेवलेले धान्यही जळून खाक झाले.
धनंजय स्पोर्ट्सचे कार्यकर्ते, हवालदार सुभाष पडळकर, डोंगराजवळील नागरिक व वनविभागाच्या कार्यकर्त्यांनी ही आग आटाेक्यात आणली.