सांगली : येथील काळ्या खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, खणीतील हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. मृत माशांमुळे वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली होती. नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. त्यानंतर काळ्या खणीत ब्लिचिंग पावडर मारण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले.काळ्या खणीत मासे मृत झाल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले. सकाळपासूनच वडर कॉलनी, सुंदरनगर परिसरात दुर्गंधी पसरली होती. मासे नेमके कशामुळे मृत झाले, याची चर्चा सुरू होती. काळ्या खणीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आहे. त्यात काहीजण मासेमारीही करतात.
अज्ञाताकडून पाण्यात रसायन अथवा गूळ टाकला असावा, त्यामुळे मासे मृत झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मार्केट यार्डातील गुळाची पोती धुतल्याने ते पाणी गटारीद्वारे काळ्या खणीत मिसळल्याने मासे मृत झाल्याचा दावा काहींनी केला. सध्या काळ्या खणीत मत्स्यपालनासाठी खासगी ठेकेदार नियुक्त केला आहे. त्याने चार दिवसांपासून चार लाख रुपयांचे लहान मासे खणीत सोडले होते. हे मासेही मृत झाल्याने या ठेकेदाराचेही लाखोंचे नुकसान झाले आहे.