शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास १५ जुलैपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:15+5:302021-07-03T04:18:15+5:30
सांगली : केंद्र सरकारची अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु आहे. या ...
सांगली : केंद्र सरकारची अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त संभाजी पोवार यांनी दिली. पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर अर्ज भरावेत. कोणतीही अडचण आल्यास महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
------
‘प्रधानमंत्री गरीब कल्याण’साठी नोडल अधिकारी नियुक्त
सांगली : कोरोनाशी संबंधित कार्यरत असणाऱ्या व सेवा देणाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजनुसार ५० लाख रुपयांचे विमा कवच असणार आहे. या योजनेंतर्गत आलेल्या अर्जांचा निपटारा करण्यासाठी उपजिल्हाधिकारी विजया यादव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. विमा अर्जांची पडताळणी करून पात्र, अपात्र अशी विभागणी करण्यासाठी नोडल अधिकारी कार्यरत राहणार आहेत.
------
प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घ्या
सांगली : जिल्ह्यातील गायी, म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नोंदणीकृत जातीवंत गायी व म्हशींपासून तयार होणाऱ्या कालवडी व रेड्यांना सहा महिन्यांच्या कालावधीनंतर प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पाच हजार रूपये देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पशुपालकांनी दि. २२ जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय धकाते यांनी केले आहे.
-----
कोरोना नियमांचे उल्लंघन, सहाजणांवर कारवाई
सांगली : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहाजणांवर संजयनगर पाेलिसांनी कारवाई केली. निर्धारित वेळेपेक्षा दुकान अधिकवेळ चालू ठेवणे यासह आरटीओ कार्यालय, बालाजीनगर, शिंदे मळा परिसरात सुरु असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील यांनी ही कारवाई केली.
------
जिल्ह्यात बेकायदा दारु विक्रीवर कारवाई
सांगली : जिल्ह्यात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई सुरु ठेवली आहे. त्यानुसार सांगली ग्रामीण पोलिसांनी विदेशी दारुच्या ३० बाटल्या, इस्लामपूर पोलिसांनी देशी दारूच्या ९ तर विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी दारूच्या १५ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.