सांगली : पाच कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना आता मार्च २०२१ चे मासिक किंवा तिमाही रिटर्न ३ बी व कर भरण्याची मुदत २० मे २०२१ पर्यंत विलंब शुल्काशिवाय भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
यासंदर्भात केंद्रीय जीएसटी विभागाने मंगळवारी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या अधिसूचनेनुसार पाच कोटींच्या आत वार्षिक उलाढाल असणाऱ्या जीएसटी करदात्यांना मार्च २१ चा मासिक व तिमाही रिटर्न जीएसटी ३ बी व कर भरण्याची मुदत २२ एप्रिल २०२१ होती, परंतु सवलत अधिसूचनेमुळे ती वाढवण्यात आली आहे. विहित मुदतीनंतर पहिल्या ३० दिवसांपर्यंत म्हणजेच २० मे २०२१ पर्यंत जीएसटी रिटर्न भरल्यास कोणतेही विलंब शुल्क त्याला लागणार नाही. तसेच पहिल्या पंधरा दिवसापर्यंत म्हणजे ५ मे पर्यंत कोणत्याही व्याजाशिवाय मात्र त्यानंतर २० मे पर्यंत व्याजासह भरू शकतील.
त्याचबरोबर पाच कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणाऱ्या मोठ्या करदात्यांना मार्च २०२१ चा मासिक जीएसटी रिटर्न ३ बी तसेच कर भरण्याची मुदत ही २० एप्रिल होती. त्यांना ५ मेपर्यंत थकीत कर नऊ टक्के व्याज दराने व रिटर्न विलंब शुल्काशिवाय भरण्याची सवलत होती. एप्रिल २०२१ च्या जीएसटीआर-१ ची वाढीव मुदत २६ मे पर्यंत तर आयएफएफ परिपत्राची वाढीव मुदत २८ मे पर्यंत आहे.