ॲपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणा हादरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:59+5:302021-06-19T04:18:59+5:30
मिरजेतील ॲपेक्स रुग्णालयातील डॉ. महेश जाधव याला सदोष मनुष्यवधप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. कोविड उपचारात हलगर्जीपणाबाबत डाॅक्टरवर ...
मिरजेतील ॲपेक्स रुग्णालयातील डॉ. महेश जाधव याला सदोष मनुष्यवधप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. कोविड उपचारात हलगर्जीपणाबाबत डाॅक्टरवर गंभीर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गतवर्षी कोविडच्या पहिल्या लाटेत महापालिकेकडून कोविड रुग्णालयाचा परवाना घेऊन डाॅ. महेश जाधव याने मिरजेतील सांगली रस्त्यावर भाड्याच्या जागेत रुग्णालय सुरू केले होते. गतवर्षीही येथे दाखल झालेल्या ४० टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. मात्र, येथे कोविड रुग्णांच्या झालेल्या मृत्यूची आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याने दुसऱ्या लाटेतही डाॅ. जाधव याचे काेविड हॉस्पिटल बिनबोभाट सुरू होते.
येथील उपचाराबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारीमुळे महापालिका प्रशासनाने त्याच्याविरुद्ध कारवाईचा पावित्रा घेतला. त्यानंतर डाॅक्टरने रुग्णांच्या जीवाशी केलेला खेळ उघडकीस आला आहे. अॅपेक्स कोविड रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपकरणे नसतानाही दोन महिन्यांत २०५ रुग्ण दाखल करून घेण्यात आले. यापैकी ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी आणखी काही अत्यवस्थ रुग्णांना शासकीय रुग्णालय व अन्यत्र पाठविण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. रुग्णालयात केलेल्या उपचारांच्या चाैकशीसाठी मिरज सिव्हिलचे डाॅ. शिशीर मिरगुंडे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. येथील रुग्णांच्या मृत्यूचे डेथ ऑडिट जिल्हा शल्यचिकीत्सकांमार्फत होणार आहे. पोलिसांनीही रुग्णांच्या मृत्यूच्या चाैकशी अहवालाची मागणी केली आहे. कोविड साथीदरम्यान रुग्णांवर उपचारासाठी बेड कमी पडू नयेत, यासाठी प्रशासनाने मागेल त्यास कोविड रुग्णालयाच्या परवानगी देत हाेते. प्रशासनाच्या या धोरणाचा फायदा घेत डाॅ. महेश जाधव याने आर्थिक फायद्यासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याचे पोलिसांच्या चाैकशीत निष्पन्न होत आहे. डॉ. जाधव यास मदत करणाऱ्या अन्य सात जणांवरही गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
चाैकट
अॅपेक्स रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २०५ रुग्णांपैकी ८७ रुग्णांचा मृत्यू झाला असून येथील मृत्युदर तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत आहे. मिरज सिव्हिलमध्ये ३५० रुग्णांवर उपचार सुरू असून मे महिन्यात २० टक्के व सध्या १५ टक्के मृत्युदर आहे. अॅपेक्स रुग्णालयाचा मृत्युदर देशात व राज्यातही सर्वाधिक असल्याने येथे रुग्णांना उपचार मिळाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.