सांगली : महापालिकेच्या समाजकल्याण समितीच्या सदस्यपदी राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती पारधी यांची नियुक्त करण्याचा महासभेचा ठराव बेकायदेशीर आहे. हा ठराव रद्द करावा, अशी मागणी नगरसेविका सोनाली सागरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे पारधीच्या नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
याबाबत सागरे म्हणाल्या की, अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना समाजकल्याण समितीत समावेश असतो. महापालिकेत ११ सदस्य हे या गटातून निवडून आले आहेत. या समितीत अनुसूचित जमाती या गटातून निवडून आलेल्या स्वाती पारधी यांना समाजकल्याण समितीत समावेश करण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या महासभेत करण्यात आला. आता या ठरावाला सर्वच पक्षातून विरोध होऊ लागला आहे.
समाज कल्याण समिती ही फक्त अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असते. हा विषय आणून अनुसूचित जाती सदस्यावर अन्याय केला जात आहे. पारधी यांच्या वाॅर्डातील एक सदस्य समाजकल्याण समितीत आहे. एकाच वाॅर्डातील दोन सदस्यांचा समितीत कसा समावेश करणार? समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या पत्रांचा उल्लेख करीत त्यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे. पण या पत्रात कुठेही पारधी यांचा समितीत समावेश करण्याबाबत उल्लेख नाही. त्यामुळे महासभेचा हा ठराव रद्द करावा अन्यथा योग्य न्यायालयात दाद मागू, असा इशाराही सागरे यांनी दिला आहे.