लोकमत न्यूज नेटवर्क
लिंगनूर : खटाव (ता. मिरज) येथे कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीने गावातील सर्व कुटुंबांची सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. समितीच्या बैठकीत विविध सर्वेक्षकांवरील जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.
सरपंच सुजाता व्हनान्नावर, उपसरपंच गुरुपाद पाटील, माजी उपसरपंच रावसाहेब बेडगे, ग्रामविकास अधिकारी संजय गायकवाड बैठकीला उपस्थित होते. सर्व अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, आरोग्यसेविका यांच्यावर संपूर्ण सर्वेक्षणाची जबाबदार सोपविण्यात आली. सर्वेक्षणावेळी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी ग्रामपंचायतीने घेतली आहे. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर पीपीई कीट, ऑक्सिमीटर, तापमापक गन, फेस शिल्ड, हातमोजे आदी साहित्याचे किट वाटण्यात आले.
सरपंच व्हनान्नावर म्हणाल्या की, गावात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. गावापासून कर्नाटक सीमा जवळ आहे. तेथून कर्नाटकातील रुग्ण गावात येऊ नयेत यासाठी सर्वांनीच दक्ष राहावे. परगावचे पाहुणे घरी आल्यास ग्रामस्थांनी त्वरित ग्रामपंचायतीला माहिती द्यावी. कुटुंबात एखादी व्यक्ती आजारी पडली तरी तशी माहिती द्यावी. वेळीच उपचार केल्याने धोका टाळता येईल.