विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी मॅनेजिंग कौन्सिलचा ठराव झाला होता. मात्र, आज बुधवारी अचानक मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे उपकेंद्र तासगाव तालुक्यात करण्यासाठी झालेला निर्णय हा राजकीय दबावापोटी घेण्यात आला असल्याचा आरोप करंजे (ता. खानापूर) येथील अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी केला. दरम्यान, खानापूर येथे होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर तालुक्यात न होण्यामागे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याची टीकाही यावेळी सूर्यवंशी यांनी केली.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी विद्यापीठाचे मॅनेजिंग कौन्सिल सहमत होते. त्याबाबतचा ठरावही खानापूरसाठी होता. मात्र, गेल्या महिन्यात खानापूर येथील शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी खानापूर व आटपाडी तालुक्यातील विद्यार्थी आणि सुशिक्षित लोकांचा विचार करून उपकेंद्र खानापूरला मंजूर करण्याबाबत सांगण्यात आले.
मात्र, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अचानक शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तासगावला उपकेंद्र होणार असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांचा हा निर्णय राजकीय दबावापोटी आहे. हा निर्णय होत असताना, खानापूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधींनीही याबाबत आपली काहीही भूमिका मांडली नाही. हा निर्णय येथील लोकप्रतिनिधींचे अपयश आहे.
परंतु, हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि खानापूर, आटपाडी तालुक्यांवर अन्याय करणारा आहे. या निर्णयाला अजून अंतिम मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे आगामी काळात लवकरच खानापूर व आटपाडी तालुक्यांतील विद्यार्थी आणि स्थानिक लोकांची एकजूट करून तीव्र संघर्ष उभा करणार असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी सांगितले.