कवठेमहांकाळ : सत्ता आल्यावर पंधरा दिवसांत स्वस्ताई आणतो म्हणणाऱ्या भाजप सरकारने महागाई दुपटीने वाढविली. जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या व शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भाजप सरकारला नेस्तनाबूत करा, असे आवाहन माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जनतेला केले.पाटील यांनी शनिवारी रामपूरवाडी, इरळी, कोंगनोळी, हिंगणगाव येथे प्रचार दौरा केला. हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील प्रचारसभेत ते म्हणाले की, अजितराव घोरपडे यांनी आजवर स्वार्थासाठी राजकारण केले. सतरा पक्ष बदलणारे नेते जनतेशी काय ईमान राखणार आहेत. आता तर घोरपडे यांनी भाजपसारख्या जातीयवादी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. स्वार्थासाठी कधी राजकारण न करता विकासाकरिता मी राजकारण केले. देशात भाजपने शेतकऱ्यांविरोधी धोरण घेऊन देशोधडीला लावण्याचा उद्योग चालवला आहे. बाबा रामदेव लोकसभेच्या निवडणुकीआधी शासनाच्या विरोधात आंदोलन करीत होते. परंतु आता महागाईने कहर केला असताना, सर्वसामान्य जनता महागाईत भरडली जात असताना ते गप्प का आहेत. या पाच वर्षात मतदारसंघाला राज्यात क्रमांक एकवर नेले. आगामी पाच वर्षात बेकारी निर्मूलनाचे काम हाती घेणार असून, तरुणांच्या हाताला काम देण्यात येईल. यावेळी विजयराव सगरे, चंद्रकांत लोंढे, चंद्रकांत पाटील, हायूम सावनूरकर यांचीही भाषणे झाली.सभेस नामदेवराव करगणे, भानुदास पाटील, गजानन कोठावळे, सुरेखा कोळेकर, विठ्ठलराव कोळेकर, नूतन वाघमारे, बबूताई वाघमारे, सरपंच संगीता माळी, उपसरपंच निलेश लोंढे, सूरगौंडा पाटील, शीतल पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्यांना पराभूत करा
By admin | Published: October 12, 2014 12:52 AM