वृध्द दाम्पत्याची वारस असूनही परवड

By admin | Published: July 24, 2014 10:44 PM2014-07-24T22:44:27+5:302014-07-24T22:45:40+5:30

शिरसीतील प्रकार : पावसाने घर पडले, मुलाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांनी दिला आधार

Despite the success of an old married couple, | वृध्द दाम्पत्याची वारस असूनही परवड

वृध्द दाम्पत्याची वारस असूनही परवड

Next

शिराळा : वारस मुलगाच असावा असेही अनेकांना वाटते. त्यासाठी काहीजण नवसही करतात. मात्र या त्याचा म्हातारपणी उपयोग नसेल, तर तो काय कामाचा? सत्तर वर्षांचे पती-पत्नी... पत्नीस अर्धांगवायू, तर पतीस अंथरूणावरून उठताही येत नाही... हे दाम्पत्य वारस असूनही बेवारस झाले आहे. त्यांचं राहतं पडकं घर पावसाने पडले. दोन दिवस भर पावसात या घरातच त्यांनी काढले. त्यांच्या वारसाला कळविले, मात्र तो आलाच नाही. शेवटी गावकऱ्यांनी या कुटुंबाला आधार दिला व त्यांना शिराळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
शिरसी (ता. शिराळा) येथे शंकर घाटके व सौ. मालूताई हे सत्तरीच्या घरातील पती-पत्नी स्वत:च्या घरात राहतात. मुलगा लग्न झाल्यावर पत्नीसह बाहेर पडला. शंकर ट्रकचालक होते. जमेल तोपर्यंत नोकरी केली. आज ते सत्तरीच्या घरात आहेत. त्यांना जागेवरून उठताही येत नाही. याचबरोबर दुसरे संकट ओढवले. सौ. मालुतार्इंना अर्धांगवायू झाला. त्यामुळे दोघेही घरातच बसून. ना नोकरी, ना धंदा, ना मजुरी!
तीन-चार दिवस पाऊस पडत आहे. काही प्रमाणात पडलेले घर या पावसामुळे संपूर्णच पडले. तोडका-मोडका संसार या पडलेल्या घरात उभा होता. मात्र सततच्या पावसाने हे पती-पत्नी आजारी पडले, पण कोणाकडेही मदतीसाठी हात पसरला नाही. ते गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसात भिजत अंथरूणावर पडून होते.
येथील बाजीराव पाटील, अण्णासाहेब भोसले, प्रकाश नांदूलकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदा नासूलकर, मधु शेवाळे यांनी या दाम्पत्याच्या मुलाला निरोप दिले; मात्र तो आला नाही. शेवटी सर्व गावकऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून शिराळा येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री दहाच्या दरम्यान दाखल केले. अंगात पाणी कमी, जंतूसंसर्ग झाला आहे. मालूताई यांना अर्धांगवायू आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सांगलीच्या शासकीय रुगणालयात पाठविणार असल्याचेही सांगितले. या वृध्द दाम्पत्याला मुलांनी डावलले, मात्र गावकऱ्यांनी मदतीचा हात दिला. (वार्ताहर)

Web Title: Despite the success of an old married couple,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.