सांगली : कोरोना हे थाेतांड असून, लोकांना भित्रट करण्यासाठी केलेले एक प्रकारचे षडयंत्र आहे. या भित्रटपणामुळेच सध्या कोणी रस्त्यावर उतरत नाही. राज्यातील देवभक्तांनी आता सर्व मंदिरांची कुलपे तोडून प्रवेश करावा, असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केले.
ते म्हणाले की, सर्वच राजकीय पक्ष स्वार्थी आहे. त्यांना जनतेच्या सुख-दु:खाशी काहीही देणे-घेणे नाही. लॉकडाऊन कशाला हवाय? सर्व दुकाने खुली करा. बाजार सुरू झाल्यानंतर देशाचे काहीही वाटोळे होणार नाही. लॉकडाऊनमुळेच वाटोळे झाले आहे.
देशातील जनतेला भित्रट, नेभळट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. शूर-विरांचा हा देश आहे. छत्रपती संभाजीराजेंनी मृत्यूच्या भयावर विजय मिळविला. ही महाराष्ट्राची थोर परंपरा आहे. त्यामुळे या कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. पंढरीची वारी म्हणजे देशाचा आत्मा आहे. त्यावर बंदी घालणे चुकीचे आहे. वारी केल्याने कोणीही मरणार नाही. देवांवर खरी श्रद्धा असणाऱ्या तमाम वारकऱ्यांनी, देवभक्तांनी आता मंदिरांची कुलपे तोडून प्रवेश करावा. मंदिर बंद करायचे कारण काय? भगवंताच्या वारीमुळेच, उपासनेमुळेच देशसेवेची ज्योत निर्माण होत असते. धैर्य, शौर्य, हिमतीला, लढाऊपणाला आपण सोडचिठ्ठी देत चाललो आहोत, त्याचे देशाला वाईट परिणाम भोगावे लागेल.
चौकट
एकही पक्ष अपवाद नाही
देशातील राजकारणी काय लायकीचे आहे हे आता लोकांना कळाले आहे. ते देशाचे सेवक नव्हेत, तर स्वत:चे पोशिंदे आहेत. सर्वच पक्ष एकजात असे आहेत. कोणीही त्याला अपवाद नाही, असेही भिडे म्हणाले.