इस्लामपूर : येथील परमिटरूम बिअरबारमध्ये गोंधळ करणाऱ्या एका तरुणीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले, मात्र तेथेही तिने आरडाओरडा आणि धिंगाणा घातला. याची नोंद पोलीस ठाण्यात नसून, ती तरुणी नंतर कोठे गेली, कोणासोबत गेली, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. बुधवारी रात्री ही घटना घडली.
येथील एका बिअरबारमधून तक्रारीचा दूरध्वनी आल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. तेथे संबंधित तरुणी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होती. महिला पोलिसांनी तिला ठाण्यात आणले. ‘त्याला माझ्यासमोर बोलवा’ इतकाच तिचा नारा होता. जिभेची बोबडी वळल्याने ताेही कोणाला कळत नव्हता. वर्णावरून ती दाक्षिणात्य असावी असे दिसत होते. ती काय आणि कोणत्या भाषेत बोलते, हे कळत नव्हते. ती मराठी, मल्याळम् की तेलगू भाषेत बोलते हेसुद्धा कळत नव्हते. महिला पोलीस तिला समजावत होत्या. त्यांच्याही अंगावर ती धावून जात होती. कधी लातूर, कधी पुणे आणि कधी सांगलीची राहणारी आहे, असे ती सांगत होती.
तिला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिच्यावर पोलिसी खाक्या दाखवला गेला. मात्र त्याचाही परिणाम झाला नाही. ती तिच्या मुद्यावर ठाम होती. तिची अवस्था गोंधळलेली होती. तिच्याकडील मोबाइल पोलिसांनी काढून घेतला. त्यानंतर माझा मोबाईल द्या, असे म्हणत ती महिला पोलिसांकडे रागाने बघत होती. या सगळ्या घडामोडीत ती लातूरवरून, पुण्यावरून की सांगलीतून आली याचे मात्र उत्तर मिळाले नाही. ती सोलापूर जिल्ह्यातून आली होती एवढीच माहिती शेवटी मिळाली.
हा सगळा घटनाक्रम घडला असताना यातील कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात नाही. त्यामुळे ती तरुणी नंतर कोठे गेली, कोणासोबत गेली, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.