विकास शहा
शिराळा
: खेड (ता. शिराळा) येथील निराधार अपंग दाम्पत्याला घरकुल मंजूर झाल्याने त्यांना हक्काचे छत मिळणार आहे. गेली दोन वर्षे हे कुटुंब मागणी करत होते. ’लोकमत’ने याबाबत बातमी प्रसिध्द केल्यावर दोन महिन्यात या कुटुंबाला घरकुल मंजूर झाले आहे. त्यामुळे आता जुने घर पाडून नवीन घर बांधण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या कागदपात्रांची पूर्तता युवक कार्यकर्ता प्रताप माळी यांनी केली.
आधाराला मुलगा नाही, कष्टाला शरीर आणि अपंगत्व साथ देत नाही. हक्काचा निवाराच कोसळलाय. आर्थिक परिस्थिती नाही. रात्री घरात झोपलं तर आभाळ दिसतंय. चंद्राच्या प्रकाशाने सारे घर उजाळतंय. घराचा उर्वरित भाग अंगावर कधी कोसळेल, याची शाश्वती नाही. यामुळे रात्रंदिवस डोळ्याला डोळा लागत नाही. कायम जीव मुठीत घेऊन पडक्या घरात राहून एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्यावर ‘कोणी घर देता का घर’ असे म्हणण्याची वेळ आली होती. बाळू बंडू माळी व मालन या दिव्यांग दाम्पत्याची ही व्यथा होती.
बाळू यांचे वय ७१ व मालन यांचे ६५ वय असून, पदरी असणारे अपंगत्व व वयोवृद्ध झाल्याने शारीरिक श्रमाची कामे होत नाहीत. जमीन एक एकर, पण तीही कोरडवाहू. शेती जमत नसल्याने ती वाट्याने दिली आहे. त्यामुळे पै-पाहुणे व रेशनच्या मिळणाऱ्या धान्यावर उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांना दुसरीकडे राहायला जागा नसल्याने त्यांना घरकुल मंजूर होणे गरजेचे होते. त्यावेळी प्रशासकीय यंत्रणा व पंचायत समितीचे उपसभापती बी. के. नायकवडी यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची तातडीने दाखल घेऊन माळी यांच्या घरकुलाचा प्रस्ताव पाठवला. अखरे मालन माळी यांच्या नावाने घरकुल मंजूर झाले आहे.