भिलवडी
: भिलवडी (ता. पलूस) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्राला शुक्रवारी शिस्त लागली असल्याचे चित्र दिसून आले. गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. १५० लसीचे डोस उपलब्ध होते; मात्र प्रमाणापेक्षा जादा लोक जमा झाल्याने हाणामारीचे प्रकार घडले होते. यातून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. प्रसारमाध्यमांनी याप्रकरणी आवाज उठविल्यानंतर गुरुवारी येथे काटेकाेर नियाेजन करण्यात आले.
भिलवडीच्या सरपंच सविता महिंद-पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, तलाठी जी. बी. लांडगे, ग्रामसेवक अजित माने आदींसह आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी गर्दी टाळण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. सायंकाळपासूनच सर्व प्रशासनासह सर्व यंत्रणा कामाला लागली. लसीकरण केंद्राबाहेर बॅरिकेटस् लावण्यात आले. १५० खुर्च्या अंतर ठेवून बांधण्यात आल्या. क्रमाने येणाऱ्या नागरिकांनी खुर्चीत बसायचे. त्यांना जागेवर टोकन दिले जाते. उपलब्ध लसीएवढे लोक बसले की, प्राथमिक आरोग्य केंद्राचे गेट बंद करायचे. इतरांनी घरी जायचे, असे नियाेजन करण्यात आले. शुक्रवारी
दिवसभर परिसरात भिलवडी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. या नियोजनामुळे शुक्रवारी सकाळी ८:३० ते १:३० या वेळेत शांततेत लसीकरण पार पडले.
चौकट
समन्वयामुळे शिस्तबद्ध नियोजन...
भिलवडी ग्रामपंचायतीची आपत्ती व्यवस्थापन समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र व भिलवडी पोलिसांनी समन्वय साधून केलेल्या नियोजनामुळे लसीकरण सुरू झाल्यापासून आज प्रथमच शिस्तबध्द कार्यक्रम सुरू असल्याने ज्येष्ठ नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
फोटो : ०७ भिलवडी १
ओळ : भिलवडी (ता. पलूस) येथे लसीकरण केंद्रावर नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली हाेती.