लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सध्याची गरज, प्राधान्यक्रम, रूपरेषेची तांत्रिक बाजू, भविष्यातील वाहतुकीचे नियोजन, व्यवहार्य मार्ग यांची सांगड न घातल्यामुळे आणि राजकीय कुरघोड्यांमुळे सांगलीतील आयर्विन पुलाला उभारण्यात येणाऱ्या पर्यायी पुलाच्या आराखड्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यातही राजकारण शिरल्याने आता प्रश्न चिघळत चालला आहे.
विश्रामबागचा उड्डाणपूल आणि कृष्णा नदीवरील हरिपूर-कोथळी पुलानंतर आता ‘पूलसम्राट’ आमदार सुधीर गाडगीळ यांनी आयर्विन पुलाच्या पर्यायी पुलाचा प्रश्न उचलून धरला आहे, तर व्यापारी पेठेवरील गंडांतर आणि वाहतुकीची कोंडी या मुद्द्यावर राष्ट्रवादीने विरोधाची धार वाढवली आहे.
कोकणातील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर ‘आयर्विन’च्या पर्यायाचा प्रश्न ठळकपणे समोर आला. ‘आयर्विन’ची आयुमर्यादा संपल्याने त्याला पर्याय उभा करण्याचे ठरताच आमदार गाडगीळ यांनी तत्कालिन भाजप शासनाकडून हा पूल मंजूर करून आणला. सुरुवातीला तो ‘आयर्विन’पासून दहा मीटरवर उभारण्याचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. मात्र, आमदार गाडगीळ यांनी नंतर पत्र दिल्याने आराखडा बदलला आणि हा पूल ४७ मीटरवर उत्तरेला उभारण्याचा नवा आराखडा तयार झाला. या पुलाचे कार्यादेश १३ नोव्हेंबर २०१९ला निघाले. हा पूल सांगलीतील पांजरपोळपर्यंत येणार होता. सांगलीवाडीच्या बाजूने कामाला सुरुवातही झाली. पण सांगलीवाडीतील चिंचबनाचे मैदान या पुलाखाली जात असल्याने विरोध झाला. भाजपचेच नेते तथा माजी आमदार दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगलीवाडीकरांनी कामच बंद पाडले. त्यावेळी तोडफोड झाली. तोंडावर विधानसभेच्या निवडणुका असल्याने आमदार गाडगीळांनी सांगलीवाडीच्या मतांसाठी सबुरी दाखवली. आता दोन वर्षे सरली. आमदार गाडगीळांनी युवा नेत्यांच्या साथीने उचल खाल्ली, पण पुन्हा विरोध सुरू झाला. यावेळी कापडपेठेतील व्यापाऱ्यांना पुढे करून राष्ट्रवादी आडवी पडली आहे.
वास्तविक सांगलीवाडीकरांचा विरोध अजूनही मावळलेला नाही. त्यातच आता या पुलाच्या जोडरस्त्यामुळे कापडपेठेतील १३३ व्यापाऱ्यांच्या जागांवर नांगर फिरणार असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे, तर या पुलावरून येणारी वाहतूक कापडपेठेऐवजी टिळक चौकातून हरभट रस्त्याकडे आणि गणपती पेठेकडे वळवता येऊ शकते, असे भाजपचे म्हणणे आहे. ‘आयर्विन’चे आयुष्य संपल्याने काही दुर्घटना घडण्याआधी त्यावरील वाहतूक वळविण्याची सध्या गरज असल्याने, पर्यायी पुलाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे चित्र पुढे आणले जात आहे. पण त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक कशी करायची, यासाठी कोणीच बोलायला तयार नाही. शहरातील वाहतुकीवर आधीच ताण आहे. हरभट रस्ता, महापालिका रस्ता, मित्रमंडळ चौक, राजवाडा चौक येथे वाहतुकीची कोंडी नित्याचीच आहे. त्यात या पुलामुळे भर पडणार नाही का, पुलावरील वाहतूक कोणत्या जोडरस्त्याने जाणार आहे, ती पांजरपोळपासून कापडपेठेऐवजी गणपती पेठेकडे आणि टिळक चौकातून हरभट रस्त्याकडे वळवणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार आहे का, ती पुलावरून कापडपेठेतून पुढे न्यायची ठरवली तर रस्ता रुंदीकरणात जागा जाणाऱ्या १३३ व्यापाऱ्यांचे पुनर्वसन कसे करणार, या प्रश्नांची उकल सध्यातरी झाली नसल्याने पुलाच्या आराखड्याचा बट्ट्याबोळ सुरू आहे.
उपयुक्तता किती आणि कशाची?
पर्यायी पूल सांगलीवाडी परिसरातील लोकांना सांगलीत येण्यासाठी आणि तसेच सांगलीतून सांगलीवाडी परिसरात जाणाऱ्यांसाठीच जादा उपयुक्त ठरणार आहे. सांगलीच्या पश्चिमेकडून थेट कापडपेठ, गणपती पेठेसह शहरात येण्यासाठी तो गरजेचा आहे. तिकडून येणाऱ्यांसाठी सध्या बायपास पूलही आहे. पण त्याची रूंदी कमी आहे. त्याच्या रूंदीकरणातून बायपासची उपयुक्तता वाढू शकते आणि नव्या पर्यायी पुलाची गरज कमी होऊ शकते.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन पर्याय
सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणतो की, या पुलावरून सांगलीत येणारी वाहतूक वळवण्यापेक्षा पांजरपोळमार्गे सरळ कापडपेठेतून जाणे तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. पुढील जोडरस्ता महापालिकेच्या कार्यकक्षेत येतो. तेथील वाहतुकीचे नियोजन महापालिका आणि पोलिसांनी करणे गृहित धरले आहे. या पुलावर अवजड वाहतूक अपेक्षितच नाही. त्यासाठी बायपासचा पर्याय आहे. पर्यायी पुलावरून केवळ दुचाकी आणि हलकी वाहने जावीत. आम्ही आधी दिलेला ‘आयर्विन’पासून दहा मीटरवर पूल उभारण्याचा प्रस्तावही व्यवहार्य आहे.