सांगली : जत तालुक्यातील दुष्काळी ४७ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासह कृष्णा नदीच्या पुराचा प्रश्न सोडविण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची शनिवार, दि.१८ रोजी सकाळी १०.३० वाजता बंगळुरू येथे बैठक होणार आहे. पाटील यांच्यासह जलसंपदा सचिव व मुख्य अभियंता बैठकीसाठी शुक्रवारी रवाना झाले.
जत तालुक्यातील पूर्व भागातील तिकोंडी, भिवर्गी, संख, उमदी, हळ्ळी, बोर्गी आदी सुमारे ४७ गावांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. येथील नागरिकांनी मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढून पाणी प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी कर्नाटकच्या तुबची- बबलेश्वर योजनेतून पाणी देण्याबाबत चर्चा सुरू होती; परंतु कर्नाटकने तुबची- बबलेश्वर योजनेतून पाणी देण्यास नकार दिला आहे. उलट महाराष्ट्र सरकारने हिप्परगी येथून आमजेश्वरी प्रस्तावित योजनेचा पूर्ण खर्च करून जतला पाणी द्यावे, अशी भूमिका घेतली आहे. शिवाय कृष्णा नदीला येणाऱ्या पुरास उतार पडण्यासाठी अलमट्टी धरणात ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवू नये, अशी महाराष्ट्राची भूमिका आहे. या दोन मुद्द्यांवर शनिवारी चर्चा होणार आहे.
तुबची-बबलेश्वर योजनेबाबत चर्चा
जलसंपदा विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांच्यासह जलसंपदा सचिव बंगळुरू येथील बैठकीसाठी शुक्रवारी रवाना झाले. शुक्रवारी दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक होऊन पाणी प्रश्नावर चर्चा झाली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे ६.७८ टीएमसी पाणी कर्नाटकला उन्हाळ्यात दिले होते. हे पाणी जत तालुक्यासाठी तुबची-बबलेश्वर योजनेमधून द्यावे, अशी कर्नाटक सरकारकडे मागणी केली आहे. यावर शुक्रवारच्या बैठकीत चर्चा झाली आहे.