सांगली : चैत्रबन ते आरवाडे पार्कपर्यंतचा नाला बांधकामासाठी शासनाने दहा कोटींच्या कामाला नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. हे काम मंजुरीसाठी स्थायी समिती सभेत आल्यानंतर ते रद्द करून इतर नाले बांधकाम करण्याचा बेकायदेशीर ठराव केला आहे. हा ठराव आयुक्तांनी विखंडित करावा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा संतोष पाटील यांनी दिला. तर स्थायी समिती बरखास्त करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, स्थायीच्या सभेत चैत्रबन ते आरवाडे पार्कपर्यंतच्या नाल्याचे बांधकाम करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून दहा कोटींचा निधी खर्च करण्यासाठी शासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. तरीदेखील स्थायी समितीने चुकीच्या पध्दतीने हा विषय रद्द केला आणि बेकायदेशीरित्या इतर नाल्यांचे बांधकाम करण्याचा ठराव केला. हा नियम सोडून चुकीचा कारभार झाला आहे. असा ठराव स्थायी समितीला करण्याचे अधिकार नाहीत. शिवाय इतर कामांचे ठराव करून आपल्या अधिकाराचा गैरवापर व दुरूपयोग केला आहे. त्यामुळे स्थायी समिती बरखास्त करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे. तसेच हा ठराव आयुक्तांनी विखंडित करावा, अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा संतोष पाटील यांनी दिला.