लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी)मार्फत गेल्या नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या स्वाध्याय उपक्रमात सांगली जिल्ह्याने २३ व्या आठवड्याच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. दर आठवड्याला व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून पाठवल्या जाणाऱ्या या अभ्यासाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शासनाकडून गेल्या नोव्हेंबरपासून स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या फोनवर अभ्यास पाठवला जात आहे. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दर आठवड्याला फोनवर वेगवेगळ्या विषयांच्या चाचण्या पाठवल्या जात आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी याला चांगला प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, चाचण्यांनंतर मिळालेले गुण व त्या संबंधित घटकाचा व्हिडीओही विद्यार्थ्यांच्या फोनवर पाठवला जात आहे. विद्यार्थी रंजकतेने हा सर्व अभ्यास पूर्ण करत आहेत.
स्वाध्याय उपक्रमाचे आतापर्यंत २३ आठवडे पूर्ण झाले असून, ताज्या आकडेवारीनुसार सांगली जिल्ह्याने राज्यात चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. जिल्ह्यातील २,१२,०५३ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमातील अभ्यास पूर्ण केला आहे. सांगली जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे योग्य मार्गदर्शन व पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला हे यश मिळाले आहे.
सांगली जिल्ह्यातील स्वाध्याय उपक्रमात कडेगाव ७४.९१ टक्के, शिराळा ७४.६७ टक्के व पलूस ६८.४९ टक्के हे तीन तालुके २३व्या आठवड्यात आघाडीवर आहेत.
चौकट -
असेही प्रयत्न
शिराळा तालुक्यात अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्कची समस्या आहे. अशाठिकाणी शिक्षकांनी स्वाध्याय उपक्रमातील प्रश्न कागदावर लिहून विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले व नंतर अन्यत्र जावून त्या चाचण्या ऑनलाईन अपलोड केल्या.