सांगली : जिल्ह्यासाठी मंगळवारी लसीचे ८ हजार २०० डोस प्राप्त झाले. त्यामुळे बुधवारपासून लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे फक्त दुसरे डोसच दिले जाणार असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी दिली.
गेल्या गुरुवारपासून जिल्ह्याचा लसींचा पुरवठा ठप्प झाला होता. मंगळवारी कोल्हापूर विभागातील सांगली, कोल्हापूर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी पुण्यातून लस उपलब्ध झाली. सांगलीच्या वाट्याला ८ हजार २०० डोस मिळाले. त्यापैकी ५ हजार ६०० डोस कोविशिल्ड लसीचे आहेत, तर २ हजार ६०० डोस कोवॅक्सिनचे आहेत. बुधवारी सकाळपासून त्यांचे वितरण सुरू होईल. महापालिकेला तसेच आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांना मिळेल. त्यामुळे दुपारपासून ठिकठिकाणी लसीकरण सुरू होणार आहे. लाभार्थींना फक्त दुसरा डोस दिला जाणार आहे. कोविशिल्ड लस घेतलेल्यांना ८४ दिवसांनी दुसरा डोस मिळणार आहे. लसीसाठी पोर्टलवरची नोंद निरर्थक असून, प्रत्यक्ष नोंदणी केलेल्यांनाच केंद्रावर बोलावले जाणार असल्याचेही पाटील म्हणाले.
दरम्यान, मंगळवारी ग्रामीण भागात फक्त २८८ जणांचे लसीकरण झाले. महापालिका क्षेत्रात व खासगी रुग्णालयात लसीकरण बंद होते.