जिल्ह्याचे तापमान ३७ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:47 AM2021-03-13T04:47:25+5:302021-03-13T04:47:25+5:30
सांगली : जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३७ अंशावर स्थिर असून दोन दिवसांत त्यात अंशाने वाढ होण्याची चिन्हे आहेत. किमान ...
सांगली : जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३७ अंशावर स्थिर असून दोन दिवसांत त्यात अंशाने वाढ होण्याची चिन्हे आहेत. किमान तापमान २० अंशावर गेले आहे. जिल्ह्याचे सध्याचे कमाल तापमान सरासरीइतके तर किमान तापमान सरासरीपेक्षा २ अंशाने अधिक आहे. १३ मार्चपासून कमाल तापमान ३८ अंशावर जाण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. आठवडाभर जिल्ह्यात आकाश निरभ्र राहणार आहे.
शहरात वीज पुरवठ्याचा लपंडाव
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील गावठाणात गुरुवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. उन्हाची तीव्रता वाढली असताना वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले होते. नागरिकांनी याबाबत महावितरण कार्यालयात तक्रारींचा पाऊस पाडला. स्टेशन चौक, वखारभाग, बदाम चौक, खणभाग, राजवाडा परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित झाला. तांत्रिक कारणास्तव वीज पुरवठा खंडित झाल्याचे महावितरण कार्यालयातून नागरिकांना सांगण्यात आले.
ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने वाहतुकीला अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या दक्षिण बाजूकडील गेटजवळ बुधवारी ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने येथील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. दोन तासांनी टायर बदलल्यानंतर वाहतुकीचा अडथळा दूर झाला.
पुलावरून ओव्हरटेकचे प्रमाण वाढले
सांगली : माधवनगर रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर ऊस वाहतूक करणारी वाहने ओव्हरटेक करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. पुलावरून ओव्हरटेक करण्यास मनाई असताना मंदगतीने अवजड वाहतूक करणारे ट्रॅक्टर ओव्हरटेक करून पूर्ण रस्ता व्यापत आहेत. त्यामुळे या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.