सांगली : जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. कृषी व सहकार अशा ग्रामीण भागाशी संबंधित खात्याचा कारभार माझ्याकडे आहे. शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करणार आहोत. विकासासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.सांगलीत सर्वपक्षीयांच्यावतीने कदम यांचा नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी स्टेशन चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, चंद्रकांत कोरे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार झाला.
यावेळी आमदार विक्रम सावंत, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, शिवसेनेचे रावसाहेब घेवारे, बजरंग पाटील, शेकापचे अॅड. अजित सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, युवकचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, नगरसेवक अभिजित भोसले, वर्षा निंबाळकर, मनोज सरगर उपस्थित होते.कदम म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांच्यावर जिल्ह्यासह सांगली शहरानेही प्रेम केले. आर. आर. पाटील, मदनभाऊ व पतंगराव कदम यांच्या निधनाने जिल्ह्याला धक्का बसला. पतंगरावांच्या नंतर पलूस कडेगावची जबाबदारी माझ्यावर आली. तेथील जनतेला विश्वास देण्यासाठी अहोरात्र काम केले.
जनतेच्या पुण्याईमुळेच पहिल्यांदा बिनविरोध आमदार होण्याचे भाग्य मला मिळाले. यंदाच्या निवडणुकीनंतर सत्तेत येणार नाही, विरोधी बाकावर बसून जनतेचे प्रश्न आक्रमकपणे सोडविण्याचे मनात ठरविले होते. पण दिवाळीनंतर गणितेच बदलली आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रिपदाची संधीही मिळाली.
राजकारणात संयम ठेवावा लागतो. १९९८ पासून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सातत्याने संघर्ष केला. पुणे लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतरही खचलो नाही. युवकचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अविरत काम केले. त्यासाठी मदनभाऊंनी मोठी मदत केली.
आता ग्रामीण जनतेशी संबंधित कृषी सहकार खाते माझ्याकडे आहे. सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहिला निर्णय झाला. सांगलीचेही काही प्रश्न आहेत. शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करू.