सांगली जिल्हा कोरोना व्हायरस प्रतिबंध व नियंत्रण कृती समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 02:10 PM2020-03-06T14:10:00+5:302020-03-06T14:15:09+5:30
सांगली जिल्हा कोरोना व्हायरस प्रतिबंध व नियंत्रण कृती समिती स्थापन फेब्रुवारीत करण्यात आली असून पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे चार बेडचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
सांगली : सांगली जिल्हा कोरोना व्हायरस प्रतिबंध व नियंत्रण कृती समिती स्थापन फेब्रुवारीत करण्यात आली असून पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे चार बेडचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
शासकीय रुग्णालय मिरज येथे 10 बेडचा अतिरिक्त स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन होत आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी देवून कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाच्या दक्षतेचे मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले असून त्याप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना संसर्गासंदर्भात राज्यस्तरावरुन मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, आय.एम.ए सांगली व मिरज, खासगी वैद्यकीय व्यवसायीक यांना मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यामध्ये एकाही प्रवाशाची कोरोना विषाणू चाचणी पॉझिटीव्ह आली नसून 1 फेब्रुवारी रोजी चीन मधून आलेला प्रथम प्रवाशी (रुग्ण नव्हे) विलगीकरण कक्षात निगराणी खाली दाखल होता त्यानंतर 4 मार्चपर्यंत तीन प्रवासी विलगीकरण कक्षात दाखल झाले.
4 मार्च रोजी दाखल झालेल्या प्रवाशाचा चाचणी अहवाल अप्राप्त असून उर्वरित प्रवाशांच्या घशातील स्त्रावांचे अहवाल नकारात्मक आहेत. या सर्व प्रवाशांच्या चाचण्या राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना घरी सोडण्यात आले असून त्यांचा 14 दिवस पाठपुरावा करण्यात येत आहे. आजतागायत राज्यस्तरावरुन कळविण्यात आलेल्या मुळच्या सांगली जिल्ह्यातील परंतु कामानिमित्त कोरोनाग्रस्त देशातून जावून आलेले ग्रामीण 04, शहरी 16 अशा एकूण 20 प्रवाशांचा दैनंदिन पाठपुरावा सुरु आहे.
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता व प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदिप व्यास यांनी घेतलेल्या राज्यस्तरीय व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये व त्याच बरोबर विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी सांगली येथे घेतलेल्या आढावा बैठकीत कोरोना आजाराबाबत विनाकारण घाबरुन जावू नये, योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन केले आहे.
सदर आजार हा थेंब संक्रमणातून होत असल्याने अजूबाजुच्या वस्तु, सार्वजनिक ठिकाणी असणारे रेलिंग, कार्यालयातील फर्निचर इत्यादीवर उडालेल्या थुंकीमध्ये हे विषाणू राहू शकतात व याला हाताळल्यानंतर निरोगी व्यक्तीच्या शरीरात संक्रमण होत असल्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे हात साबन लावून नळाच्या पाण्याखाली वारंवार घुवावेत. विनाकारण हात डोळे, नाक, तोंड यांना लावू नयेत, हस्तांदोलनाऐवजी भेटी दरम्यान भारतीय नमस्कार करण्यास प्राध्यान्य द्यावे, शक्यतो दोन व्यक्तींनी संवाद साधाताना साधारण तीन फुटांचे अंतर ठेवावे, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा.
एन-95 मास्क हा फक्त या आजारावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठीच आहे. याच्या वापरासाठी सर्वसामान्य लोकांना विनाकारण आग्रह धरु नये. कोणतेही गर्दी जमाविणारे कार्यक्रम उदा. सभा, सम्मेंलन, शिबीर, कार्यशाळा, मेळावे, विविध समारंभांस जाणे टाळावे.
संयोजकांनी असे कार्यक्रम काही दिवस पुढे ढकलावेत. परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या भारतातील अंतरराष्ट्रीय विमानतळांवर विशिष्ट तपासण्या केल्या जात असून परस्पर कोरोना बाधित रुग्ण आपल्या जिल्ह्यामध्ये तपासणी न होता परस्पर येवू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये.