सांगली : एकवेळ काम न केले तरी चालेल, पण भ्रष्टाचार अजिबात करू नका, असा कानमंत्र बुधवारी महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या नूतन सरपंचांच्या मेळाव्यात दिला.
कर्नाळ रस्त्यावरील मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, माजी आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतींसाठी वेगवेगळ््या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसा येणार आहे. निवडून आलेल्या सरपंचांनी चांगले काम करायला हवे. पैशाचा योग्य विनियोग व्हायला हवा. एक रुपयाचेही काम केले नाही तरी चालेल, पण भ्रष्टाचार करू नका.
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत सर्वांनी जपलेली भ्रष्टाचाररहीत कार्यपद्धती ग्रामपंचायत स्तरावरही टिकविता आली पाहिजे. निविदा घेणारी व्यक्ती सरपंचांचे कोणी नातेवाईक असता कामा नये. गावाने वाहवा केली पाहिजे, असे काम करा.
सांगली जिल्ह्यातील पक्षाला मिळालेले यश पाहिल्यानंतर आश्चर्य वाटते. कधीही इतके यश जिल्ह्यात भाजपने पाहिले नव्हते. ग्रामपंचायतीत १८६ सरपंच आमचे निवडून येतील, असा विचारही केला नव्हता. लोकसभेमध्ये भाजपला जिल्ह्यात यश मिळाले, तेव्हा विरोधकांनी हा मोदींचा प्रभाव असल्याचा गाजावाजा केला. त्यानंतर विधानसभेतही चार आमदार निवडून आले तेव्हासुद्धा मोदींचा प्रभाव व ही सूज असल्याची टीका त्यांनी केली.
नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर जेव्हा आम्ही जिंकलो, तेव्हा विरोधकांना काय होत आहे, ते कळून चुकले. मोदींच्या प्रभावाबरोबरच हा पक्षीय वाटचालीवरचा लोकांचा विश्वास आहे. लोकांनी चांगली कामे करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश भाजपच्या पदरात टाकले आहे. या संधीचे सोने करीत लोकांच्या अपेक्षा नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पूर्ण कराव्यात, त्यासाठी गतीने विकासकामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेला निवडून आले. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर ते मतदारसंघातही जात नाहीत, कारण त्यांना पाच वर्षातील कामावर भरोसा असतो. जी व्यक्ती पाचवेळा निवडून येते, त्याच्या कामाची वेगळी पावती द्यायची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.