लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लसीकरणासाठी ठिकठिकाणी तरुणांच्या रांगा लागत असताना लसीचा पुरवठा मात्र अत्यल्प होत आहे. १८ ते ४५ वयोगटातील तरुणांच्या लसीकरणासाठी जिल्ह्याला अवघ्या ७,५०० मात्रा मिळाल्या आहेत. इतक्या अत्यल्प पुरवठ्यातून लसीकरण गती कसे घेणार असा मोठा प्रश्न आरोग्य यंत्रणेपुढे आहे.
१ मेपासून जिल्ह्यात १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले. जानेवारीपासून हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू झाले आहे. पुरेशी लस मिळत नसल्याने आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस ते बंद असते. या स्थितीत १ मेपासूनच्या लसीकरणासाठी लस मिळण्याविषयी जिल्हा प्रशासन साशंक होते. प्रशासनाची शंका खरी ठरताना पुरेशी लस मिळालीच नाही. अवघ्या साडेसात हजार मात्रा मिळाल्या. लसीसाठी ऑनलाईन नोंदणीला तुफान प्रतिसाद आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंतची(दि.६) नोंदणी आताच पूर्ण झाली आहे. लस जेमतेम मिळाल्याने फक्त पाचच ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आली. यामध्ये सांगलीत जामवाडी व मिरजेत समतानगर शहरी आरोग्य केंद्रे, कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय व विटा ग्रामीण रुग्णालय येथे लस टोचली जात आहे. सोमवारअखेर १,६६१ तरुणांना लस टोचण्यात आली होती.
जिल्ह्याची लोकसंख्या ३२ लाख आहे. यापैकी सुमारे २६ लाख लोकांना लस टोचण्याचे उद्दिष्ट्य आहे. आजवर ५ लाख ६४ हजारजणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यंत्रणेला अद्याप लांबचा पल्ला गाठायचा आहे. पण लस नसल्याने ही मोहीम अडथळ्यांची शर्यत बनली आहे.
चौकट
कोणी काय करायचे?
६० वर्षांवरील
६० वर्षांवरील लाभार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करून किंवा थेट केंद्रावर जाऊन लस घेता येते. जिल्हाभरात ३७७ केंद्रांवर लस दिली जाते. महापालिका क्षेत्रात महापालिकेची शहरी आरोग्य केंद्रे तसेच खासगी रुग्णालये अशा एकूण ३१ केंद्रांवर लसीकरणाची सोय आहे.
४५ वर्षांवरील
४५ ते ५९ वर्षांवरील लाभार्थ्यांसाठीही ३७७ केंद्रांवर लसीकरणाची सोय आहे. अर्थात आजमितीला सर्वच केंद्रांवर लस उपलब्ध नाही. ऑनलाईन नोंदणी केली असली तरी दिलेल्या वेळेत लस मिळेलच याची शाश्वती नाही. नागरिकांना लस आल्यानंतर केंद्रावर जाऊन लस घेता येईल. शहरी आरोग्य केंद्रात कुपनांचे वाटप झाले असून लस उपलब्धतेचा निरोप मिळाल्यावर केंद्रावर जाता येईल.
१८ वर्षांवरील लस घेतलेले नागरिक
१८ वर्षांवरील लस घेतलेल्या लाभार्थींनी २ ते ४५ दिवसांपर्यंत दुसरा डोस घ्यावा. सध्या लसीचा तुटवडा असला तर दुसऱ्या डोसच्या कालावधीपर्यंत पुरवठा होईल अशी आरोग्य विभागाला अपेक्षा आहे.
चौकट
कोणाला पहिला मिळेना, तर कोणाला दुसरा
लस टोचण्यासाठी १८ वर्षांवरील गटात नोंदणीचा प्रयत्न केला, पण गावाजवळ केंद्र नसल्याचे समजले. इतरत्र शोधले असता फक्त पाचच केंद्रांवर सोय दिसली. तेथेदेखील बुकींग फुल्ल झाले आहे. गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने लस घेण्याची गडबड केली, पण लस नसल्याने निरुपाय झाला.
- करण पवार, मल्लेवाडी
४५ वर्षांवरील गटातून एक डोस ५ एप्रिल रोजी घेतला. २८ दिवसांनी दुसरा घ्यायचा होता, पण लस नसल्याचे सांगण्यात आले. ४५ दिवसांपर्यंत दुसरा डोस घेतला तरी चालतो, असेही डॉक्टरांनी सांगितले, त्यामुळे सध्या दुसऱ्या डोससाठी लसीच्या प्रतीक्षेत आहे.
- रावसाहेब कुचीकर, मिरज
पहिला डोस एप्रिलमध्ये घेतला होता. आता दुसऱ्या डोससाठी थांबावे लागत आहे. दोनवेळा केंद्रावर गेलो, पण लस नसल्याचा फलक पहायला मिळाला. पहिला डोस घेऊन महिना झाला आहे, येत्या पंधरवड्यात दुसरा मिळाला नाही तर खासगी रुग्णालयात प्रयत्न करणार आहे.
- शशिकांत खामकर, सांगली
कोट
जिल्ह्याला शुक्रवारपासून लस मिळालेली नाही. सर्व म्हणजे २६७ केंद्रांवर लसीकरण थांबले आहे. १८ ते ४५ वयोगटासाठी ७५०० मात्रा मिळाल्या आहेत. उर्वरित वयोगटासाठी २ लाख लसींची मागणी केली आहे.
- डॉ. विवेक पाटील, लसीकरण अधिकारी.
पॉईंटर्स
१) आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण - ५,६३,९२२
- फ्रंटलाईन वर्कर्स पहिला डोस - २४,९४३
- दुसरा डोस - ८,२८१
- ६० पेक्षा जास्त वयाचे पहिला डोस - २,२८,७७३
- दुसरा डोस - २७,८२८
- १८ ते ४५ वयातले पहिला डोस - १६६१
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
२१ टक्के